सायफाय – आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि हिंदुस्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

या वर्षीच्या जुलै महिन्यात बंगळुरूमधील एका स्टार्टअप कंपनीने आपल्या 90 टक्के कर्मचाऱयांच्या जागी आर्टिफिशल इंटेलिजन्सने (AI) सज्ज असलेले चाट बॉट बसवले आणि रातोरात ही बातमी देशात खळबळ उडवून गेली. कारण या बदलामुळे कंपनीला मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद तर वाढलाच, पण कंपनीचा खर्चदेखील 85 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा खुद्द कंपनीच्या संस्थापकाने केला होता. AI मुळे जगभरातील अनेकांच्या नोकऱया धोक्यात आलेल्या आहेत असा समज पसरलेला असताना आता हिंदुस्थानातदेखील आर्टिफिशल इंटेलिजन्सने घबराट निर्माण केली आहे. देशातील किती लोकांच्या नोकऱया आर्टिफिशल इंटेलिजन्स गिळंकृत करणार आहे, यासंदर्भातील चर्चेला जोर चढला आहे.

आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या संदर्भात या विषयातील तज्ञांमध्येदेखील दोन गट निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसते. सोशल मीडियावर आपला अनुभव व्यक्त करताना एका बँक कर्मचाऱयाने सांगितले की, ई-मेलच्या माध्यमातून हेड ऑफिसबरोबर संपर्कात राहणे, ग्राहकांच्या तक्रारींना उत्तरे देणे, त्यांना विविध पर्याय सुचवणे ही त्याची मुख्य कामे आहेत. एके दिवशी थोडय़ा मोकळ्या वेळेत त्याने गंमत म्हणून एका तक्रारीच्या ई-मेलला उत्तर देण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून पाहिला. आर्टिफिशल इंटेलिजन्स बॉटने त्या कर्मचाऱयापेक्षा कमी वेळेत आणि अधिक सुस्पष्ट असे उत्तर लिहून दाखवले. समोर काही मिनिटांत जे काही घडले ते पाहून मी स्तब्ध झालो असे हा कर्मचारी लिहितो. हे तंत्रज्ञान आता कधीही आपली नोकरी हिसकावून घेऊ शकते अशी भीती त्याला वाटू लागली आहे.

दुसरीकडे या तंत्रज्ञानाची भीती न बाळगता उलट त्याच्याशी मैत्री करण्याचा सल्ला काही तज्ञ मंडळी देत आहेत. या तंत्रज्ञानाकडे संधी म्हणून बघण्याचे आवाहन ते करीत आहेत. या तज्ञांच्या मते आर्टिफिशल इंटेलिजन्सकडे भविष्यातले तंत्रज्ञान म्हणून पाहिले जात आहे. आजच्या घडीला हे तंत्रज्ञान कुठल्याही क्षेत्रात परिपूर्ण नाही, तर हळूहळू ते विकसित होत आहे. त्याच्याशी सुसंवाद साधला, मैत्री केली तर या तंत्रज्ञानाच्या जोडीने मानवाचादेखील विकास होणार आहे. आजही असे अनेक ग्राहक आणि कंपन्या आहेत, ज्यांना यंत्रापेक्षा मनुष्यावर जास्त विश्वास आहे. त्यामुळे थोडय़ाच काळात आर्टिफिशल इंटेलिजन्स जग काबीज करेल अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता आपले ज्ञान अधिक समृद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करणे सध्या महत्त्वाचे आहे.

नोकरी करणाऱया वर्गातदेखील आर्टिफिशल इंटेलिजन्सविषयी भिन्न भिन्न मते दिसून येत आहेत. काही लोकांच्या मते त्यांच्याकडे जी गुणवत्ता आहे, ग्राहकांना आकर्षित करण्याची, त्यांना काय हवे नको ते ओळखण्याचे कौशल्य आहे, त्याच्याशी सध्या कोणतेही तंत्रज्ञान बरोबरी करू शकत नाही. कदाचित भविष्यात आर्टिफिशल इंटेलिजन्स त्यांच्या क्षेत्रात शिरेलदेखील, पण तो मानवाची बरोबरी नक्की करू शकणार नाही. काही कर्मचाऱयांच्या मते सध्या तरी हिंदुस्थानात आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे खूप काही नोकऱयांवर गदा आली आहे असे कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना सध्या तरी त्याचा धोका आहे असे वाटत नाही. मात्र दुसरीकडे भविष्यात मात्र त्यांच्या नोकऱया जाण्याची भीती त्यांना सतावत असल्याचे ते मान्य करतात.

कंपन्यांना मात्र हे तंत्रज्ञान अधिक फायद्याचे आणि किचकट काम सुलभ आणि झटपट करण्यास उपयुक्त वाटते आहे. कोणतेही तंत्रज्ञान हे समाजाला पुढे नेत असते. त्यामुळे त्याच्यापासून पळण्यापेक्षा त्याला आपलेसे करणे योग्य असे त्यांना वाटते. सध्या तरी हिंदुस्थानातील कंपन्या पूर्णपणे आर्टिफिशल इंटेलिजन्सवर विसंबून राहण्यास तयार नाहीत असे साधारण चित्र दिसते आहे. मात्र ज्या वेगाने हे तंत्रज्ञान प्रगत होत आहे ते पाहता भविष्यात इतर कंपन्यांच्या तुलनेत स्पर्धेत टिकण्यासाठी अनेक कंपन्या याचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू करणार हे नक्की आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाची अवाजवी भीती न बाळगता योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन या तंत्रज्ञानाशी स्वतःच्या कौशल्याची सांगड कशी घालता येईल हे महत्त्वाचे ठरणार आहे.

[email protected]