
>> प्रसाद ताम्हनकर
‘Climate Change’ अर्थात ‘हवामानातील बदल’ किंवा ज्याला आजकाल ‘जलवायु परिवर्तन’ अशा नावाने ओळखले जाते, त्या धोक्याचा मोठा फटका अनेक देशांना सध्या बसत आहे. मानवाच्या विविध कृत्यांमुळे जसे की कारखाने, गाडय़ांच्या बेसुमार वापराने जळणारे इंधन इ. मुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि त्यामुळे होणाऱया हवामान बदलामुळे मानव आणि निसर्ग दोघांनाही प्रचंड धोका निर्माण झालेला आहे. समुद्राची पातळी वाढणे, भयानक दुष्काळ पडणे, पशुपक्ष्यांच्या प्रजाती संपूर्ण नष्ट होणे असे अनेक धोके यामुळे निर्माण होत आहेत आणि ते वाढत चालले आहेत.
जलवायू परिवर्तनाच्या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्राच्या ‘इंटर गव्हर्मेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ (IPCC) नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालामध्ये हवामान बदलामुळे हिंदुस्थानवर होणाऱया परिणामांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे आणि धोक्याचा इशारादेखील देण्यात आलेला आहे. हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका हिंदुस्थानला आर्थिक आघाडीवर बसणार असल्याची चिंता यात व्यक्त करण्यात आली आहे.
या हवामान बदलामुळे शतकाच्या अखेरीस सुमारे 50 दशलक्ष लोकांचे जीवन धोक्यात येणार आहे. मुंबई, चेन्नई आणि गोव्याच्या किनारी भागांना समुद्रात बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी प्रचंड वाढत असल्याचा हा परिणाम असणार आहे. हिंदुस्थान तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला देश आहे. हिंदुस्थानी समुद्राची लांबी सुमारे 7516.6 किलोमीटर आहे. त्यातच हिंदुस्थानची लोकसंख्या प्रचंड असल्याने समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा सर्वात मोठा फटकादेखील आपल्याच देशाला बसणार आहे. या अहवालानुसार दरवर्षी साडेतीन कोटी लोकांना किनारपट्टीवरील भागात पुराचा धोका निर्माण होणार आहे.
मुंबई, चेन्नई, गोवा, ओडिशा, विशाखापट्टणम या हिंदुस्थानच्या समुद्रकिनारी असलेल्या शहरांच्या खालच्या भागात समुद्राच्या पाण्याचा मोठा धोका निर्माण होणार आहे. तसेच या शहरांना मुसळधार पावसाचादेखील सामना करावा लागू शकतो. या सर्व प्रकारामुळे या शहरातील समुद्र 0.08 डिग्री गरम होईल आणि त्यामुळे चक्रीवादळांचा धोकादेखील निर्माण होईल. ही तीव्रता जसजशी वाढत जाईल, तसतशी निर्माण होणाऱया चक्रीवादळांची संख्यादेखील वाढत जाईल. सध्या ही शहरे गरम वारे आणि मुसळधार पाऊस अशा दोन समस्यांचा सामना करत आहेतच.
हिंदुस्थानातील मैदानी शहरे जसे की दिल्ली, हैदराबाद, पाटणा, लखनौ, बिहार अशा शहरांनादेखील या हवामान बदलाचा फटका बसणार असून त्यांना असह्य उष्णता आणि भयानक थंडी अशा दोन आपत्तींचा सामना करावा लागणार आहे. इथले एकूण वातावरणच असह्य बनू शकते. हिंदुस्थानातील काही भागाला आणि मुख्यतः उत्तरेकडील शहरांना अत्यंत धोकादायक अशा ‘वेट बल्ब’ तापमानाचा सामना करावा लागणार आहे. ‘वेट बल्ब टेंपरेचर’ म्हणजे उष्णता आणि आर्द्रता एकत्र करून मोजलेले तापमान असते. पृथ्वीवरील बहुतेक देशांत हे तापमान 25 ते 30च्या आसपास असते. हे तापमान 31च्या आसपास गेल्यास ते मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. प्रदूषणाचे उत्सर्जन असेच वाढत राहिल्यास लखनौ आणि पाटणासारख्या शहरांमध्ये तापमान 35 डिग्री सेल्सियस वेट बल्बपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर मुंबई, अहमदाबाद, भुवनेश्वर, इंदूर, चेन्नई इथले ‘वेट बल्ब’ तापमान 32 ते 34 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. झारखंड, त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय, छत्तीसगड, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि पंजाब या राज्यांनादेखील याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.





























































