साय-फाय : भविष्यातील युद्ध होणार खनिजांसाठी?

>>प्रसाद ताम्हनकर

इंधन जगाचा श्वास आहे’ असे म्हटले जाते. इंधनाचा वापर जसा प्रगतीसाठी केला जातो, तसाच इंधनाचे महत्त्व जगाच्या लक्षात आल्यापासून काही देशांकडून त्याचा वापर ‘शस्त्र्ा’ म्हणूनदेखील केला जातो. ‘इंधन’ या शस्त्र्ााचा वापर किती खुबीने करता येतो हे सध्या रशियाने युक्रेन युद्धाच्या दरम्यान दाखवून दिलेले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले आणि त्यावेळी घडलेल्या एका घटनेने पूर्ण ‘लंडन मेटल एक्सचेंज’ थक्क झाले. झाले असे की, ‘निकेल’ या धातूची किंमत अचानक प्रचंड वेगाने वाढू लागली आणि बघता बघता फक्त 18 मिनिटांत ती एक लाख डॉलर प्रतिटन इतक्या उच्चांकावर पोहोचली. शेवटी निकेलचे व्यवहार काही काळासाठी रोखण्यात आले.

या किमतीच्या गगनाला भिडण्यामागे पाश्चात्त्य देशांनी रशियावर लादलेले निर्बंध कारणीभूत आहेत असे मानले जाते. मात्र या घटनेने जगात ‘निकेल’सारख्या धातूला किती महत्त्व आले आहे हे अधोरेखित झाले. 20व्या शतकाच्या इतिहासात ‘तेला’ने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती; तर आता 21व्या शतकात ऊर्जा परिवर्तनात महत्त्वाची कामगिरी पार पाडणारी खनिजे महत्त्वाची भूमिका निभावतील. ऊर्जा परिवर्तनासाठी 17 खनिजे महत्त्वाची असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. निकेल, तांबे, ग्रॅफाईट, कोबाल्ट, लिथियम ही यापैकी महत्त्वाची खनिजे मानले जातात. ज्या देशांमध्ये ही विपुल प्रमाणात सापडतात; त्या देशांना भविष्यात याचा प्रचंड फायदा मिळण्याची शक्यता आहे.

या खनिजांचे भविष्यातील महत्त्व लक्षात घेता काही देश त्यांचा ‘शस्त्र्ाा’प्रमाणे वापर करण्यासदेखील मागेपुढे बघणार नाहीत. हेच पुढे युद्धाचे कारण ठरल्यास आश्चर्य वाटायला नको. स्वच्छ ऊर्जा, हरित ऊर्जा, अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रिकल बॅटऱयांची निर्मिती अशा अनेक कारणांसाठी गरजेची असलेली ही खनिजे अमूल्य बनत जाणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी तर अक्षय ऊर्जा आणि इलेक्ट्रिकल बॅटऱयांचा निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱया खनिजांचे स्थानिक उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी आणि तिला मदत म्हणून ‘उत्पादन संरक्षण कायदा’ लागू करण्याची घोषणा केली. यावरून खनिज बाजारपेठेच्या भविष्याचा अंदाज बांधणे सहज शक्य आहे.

सध्या या क्षेत्रात रशिया सर्वात प्रबळ मानला जातो. रशियाची आर्थिक शक्ती प्रामुख्याने जीवाश्म इंधनांवर अवलंबून आहे असे मानले जाते. रशिया जगातील दुसरा सर्वात मोठा गॅस उत्पादक आणि तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक आहे. खनिजांचा विचार केला तरीदेखील भविष्यात या देशाला प्रचंड महत्त्व येणार आहे. कारण रशिया हा जगातील कोबाल्ट आणि प्लॅटिनमचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार आणि निकेलचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार आहे. त्याचप्रमाणे इतर देशांचा विचार केला तर जगातील कोबाल्टचा सर्वात मोठा साठा काँगो प्रजासत्ताक, निकेलचा सर्वात मोठा साठा इंडोनेशिया, लिथियमसाठी ऑस्ट्रेलिया आणि तांबे चिलीमध्ये सापडते. चीनमध्येदेखील काही दुर्मिळ खनिजे काढली जातात. तसेच खनिजांवर प्रक्रिया करण्यातदेखील चीन आघाडीवर आहे.

2040 पर्यंत या खनिजांची मागणी प्रचंड वेगाने वाढलेली असेल. याचा फायदा या खनिजांची जिथे विपुलता आहे, त्या देशांना आणि जोडीने जे देश या महत्त्वाच्या खनिजांवर प्रक्रिया करण्यात आघाडीवर असतील त्यांना होणार आहे. मात्र या धातूचा पुरवठा त्यांच्या मागणीच्या प्रमाणात कमी पडला; तर या खनिजांचे भाव गगनाला भिडण्याचीदेखील शक्यता आहे. युक्रेन युद्धाच्या काळात ‘निकेल’ने याची कशी चुणूक दिली आहे, ते आपण वर पाहिलेच.

या क्षेत्रातील तज्ञ सांगतात की, या खनिजांचे, धातूंचे महत्त्व सगळ्यांनी लवकरात लवकर समजून घ्यायला हवे आहे. कारण सर्वात महत्त्वाची असते ती धातू काढण्याची प्रक्रिया. मुख्य म्हणजे धातूंचे उत्खनन करणारे जे खाण प्रकल्प असतात त्यांना पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी कमीत कमी एक दशक (साधारणतः 16 वर्षे) लागतात. त्यामुळे आगामी काळात या खनिजांचा तुटवडाच भासण्याची शक्यता जास्त असणार आहे.

 [email protected]