2024 मध्ये यशस्वी व्हायचे असल्यास… प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला दिला महत्त्वाचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prashant-kishore

निवडणुकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यशस्वी व्हायचे असेल तर नेतृत्वासंदर्भातील संभ्रम दूर करून निश्चित नेतृत्त्व जाहीर करावे लागेल. नेतृत्त्वाचा दुष्काळ संपवणे आवश्यक असल्याचे त्यांनी दिला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले.

‘हिंदुस्थानातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मरण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, जोपर्यंत देश आहे तोपर्यंत काँग्रेस जिवंत राहिल’, अशाप्रकारे निवडणुकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांसोबतच्या त्यांच्या बैठकींमध्ये अलीकडेच सादरीकरण केले आहे. महात्मा गांधींच्या शब्दांच्या आधारे त्यांनी देशातील जुन्या पक्षाची स्थिती मांडली.

वारंवार झालेल्या पराभवानंतर, प्रथम 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आणि नंतर या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये, काँग्रेसचे डळमळीत जहाज आता आपले हरवलेले वैभव पुन्हा मिळवण्यासाठी ठोस योजनेवर अवलंबून आहे. यासाठी पक्षनेतृत्वाने प्रशांत किशोर यांच्याकडून मदत घेण्याचा विचार केला. त्यांनी काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची ‘ब्लू प्रिंट’ दिल्याचे समजते.

प्रशांत किशोर यांनी त्यांच्या सादरीकरणात काँग्रेसचे गणितीय सामर्थ्य आणि कमकुवतता यावर विशेष लक्ष केंद्रित करून देशाच्या राजकीय पार्श्वभूमीत सध्याची स्थिती मांडली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीची ब्लू प्रिंट या योजनेत देशाची लोकसंख्या, काँग्रेस खासदार आणि आमदारांची संख्या, महिला, तरुण, छोटे व्यापारी आणि शेतकरी यांच्याकडे पक्षाचा दृष्टीकोन यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रशांत किशोर यांनी 2024 मध्ये 13 कोटी प्रथमच मतदार ठरणाऱ्यांवरही लक्ष केंद्रित केले.

लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसचे फक्त 90 खासदार आणि देशात 800 आमदार होते, अशी आठवण प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला करून दिली. ते म्हणाले की, काँग्रेस तीन राज्यात सत्तेत आहे, तर आणखी तीन राज्यांमध्ये आघाडी सरकारचा भाग आहे. 13 राज्यांमध्ये हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यांनी काँग्रेसला आठवण करून दिली की 1984 पासून त्यांची मतांची टक्केवारी कमी होत चालली आहे.

प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला सल्ला

1. काँग्रेसला नेतृत्वासंदर्भातील संभ्रम दूर करून निश्चित नेतृत्त्व जाहीर करावे लागेल.

2. युतीचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.

3. पक्षाने आपल्या पूर्वीच्या आदर्शांकडे परत यावे.

4. काँग्रेसला तळागाळातील आपले कार्यकर्ते आणि नेत्यांना एकत्र करावे लागेल.

5. पक्षाने आपल्या संपर्क प्रणालीमध्ये फेरबदल करणे आवश्यक आहे.