“बिहारमध्ये मते खरेदी करण्यात आली, प्रत्येक मतदारसंघात…”, प्रशांत किशोर यांचा आरोप, निवृत्तीवरही स्पष्टच बोलले

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला भोपळा मिळाला. 238 जागा लढवूनही त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. एवढेच नाही तर जनसुराज पक्षाला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली. या निकालानंतर प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर ‘मन की बात’ व्यक्त केली. प्रशांत किशोर यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि आम्ही लोकांचा विश्वास जिंकू शकलो नाही असे म्हटले. तसेच प्रायश्चित्त घेण्याचेही ठरवले आहे.

साडे तीन वर्षांपूर्वी व्यवस्था बदलण्याच्या कल्पनेने बिहारमध्ये आलो होतो. आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले, पण अयशस्वी ठरलो. व्यवस्था बदलायचे सोडून द्या, आम्ही सत्ता परिवर्तनही करू शकलो नाही. हे मान्य करण्यात काहीही गैर नाही, असे प्रशांत किशोर म्हणाले. जनतेने आम्हाला निवडून दिले नाही. आमच्या प्रयत्नात नक्कीच काहीतरी त्रुटी असेल, म्हणून जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला नसेल. याची जबाबदारी माझी आहे, असेही ते म्हणाले.

प्रायश्चित्त घेणार

जनसुराजच्या विचारसरणीत आणि व्यवस्था बदलाच्या प्रयत्ना सामील झालेल्यांनी एक स्वप्न पाहिले होते. बिहारमध्ये नवीन व्यवस्था निर्माण होऊ शकते अशी आशा होती. पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि हा दोष मी माझ्यावर घेतो. याबद्दल मी माफी मागतो आणि प्रायश्चित्त म्हणून गांधी भितिहरवा आश्रमात एक दिवसांचे मौन उपोषण करणार आहे, असे ते म्हणाले.

मते खरेदी करण्यात आली

बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये टाकण्यात आले. याचा उल्लेख करत प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये मते खरेदी केली गेली असा आरोप केला. बिहारमध्ये मते खरेदी करण्यात आली आणि यासाठी 40 हजार कोटींचा खर्च करण्यात आला. प्रत्येक मतदारसंघातील 60 ते 62 हजार महिलांना प्रत्येक 10 हजार रुपये देण्यात आले. तसेच निवडणुकीच्या तोंडावर 18 नवीन योजनाही जाहीर करण्यात आल्या. पैसे देऊन मते खरेदी केली नसती तर जेडीयू 25 जागाही जिंकू शकली नसती, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

निवडणुकीत घोळ?

दरम्यान, आपण बिहार सोडणार नसल्याचे म्हणत प्रशांत किशोर यांनी आगामी काळात बिहारमध्ये व्यवस्था सुधारण्यासाठी अभियान हाती घेणार असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचेही सूचक विधान केले. मधुबनीमध्ये उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला आणि त्यांच्या चिन्हाला कुणी ओळखत नाही, तरी तिथे त्यांना एक लाख मतं मिळाली. हे कसे शक्य आहे? अनेक मतदारसंघात असे घडल्याचेही ते म्हणाले.