प्रशांत किशोर प्रायश्चित्त घेणार एका दिवसाचे मौनव्रत करणार

बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या जन सुराज पक्षाच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी प्रशांत किशोर यांनी स्वीकारली आहे. या अपयशाचे प्रायश्चित्त म्हणून एका दिवसाचे मौनव्रत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ‘आमचे प्रयत्न अपयशी ठरले. आमच्याकडून चुका झाल्या आहेत. आम्ही यावर आत्मचिंतन करू,’ असे किशोर म्हणाले. ‘काही लोकांना वाटते, मी बिहार सोडून जाईन; पण हा त्यांचा भ्रम आहे. आम्ही चुकलो म्हणजे गुन्हा केलेला नाही. आम्ही पैसे देऊन मतं विकत घेतली नाहीत किंवा हिंदू-मुस्लिम राजकारण केले नाही. ज्यांनी ते केले त्यांना हिशेब द्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

राजकीय संन्यासाच्या घोषणेवर पलटी

नितीश कुमारांच्या पक्षाला 25 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास राजकीय संन्यास घेण्याची घोषणा किशोर यांनी केली होती. मात्र त्यावरून आज पलटी मारली. ‘जन सुराज पक्षात मी कुठल्याही पदावर नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही,’ असे किशोर म्हणाले.