स्वतंत्र विदर्भ चळवळीत प्रशांत किशोर यांचा सहभाग, लवकरच बैठकही घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक रणनीतिकार आणि राजकीय मार्गदर्शक प्रशांत किशोर आता स्वतंत्र विदर्भ चळवळीत सहभागी होणार आहेत. त्यासाठी त्यांच्या अमरावती आणि नागपूरच्या चळवळीतील कार्यकर्त्यांशी सातत्याने ऑनलाईन चर्चा होत असल्याचं वृत्त आहे.

स्वतंत्र विदर्भ चळवळीसाठी प्रशांत किशोर यांच्या प्रकाश पोहरे, माजी आमदार आशिष देशमुख, नितीन मोहोड, नितीन रोंघे आणि मुकेश समर्थ इत्यादींशी चर्चा होत आहेत. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी प्रशांत हे खूपच सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. चळवळीतील काहींनी यापूर्वी त्यांची भेट घेऊन या चळवळीला मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.

त्यानंतर प्रशांत यांनी आपलं 20 सदस्यांचं पथक विदर्भ दौऱ्यावर पाठवलं होतं. या पथकाने विदर्भातील 11 जिल्ह्यांचा तपशीलवार अभ्यास करून एक अहवाल सादर केला होता. त्या आधारे प्रशांत किशोर यांनी स्वतंत्र विदर्भ हा त्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असल्याचं म्हटलं होतं.

त्या पार्श्वभूमीवर प्रशांत हे 20 सप्टेंबर रोजी एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत स्वतंत्र विदर्भ चळवळीची पुढची रूपरेषा आणि रणनीती यांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसंच, प्रशांत किशोर यांचं पथक चळवळीतील 250 जणांच्या गटाला ही चळवळ पुढे नेण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे.