
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे. काँग्रेस आमदार भारत भालके यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचा खळबळजनक खुलासा भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी केला आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत परिचारक बोलत होते. भालके यांच्यावर आरोप करताना आमदार परिचारक म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी भालके हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते. मी भाजप उमेदवाराला मदत करतो, पण माझ्या साखर कारखान्याला मदत करा, अशी आर्जवं त्यांनी केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांची झालेली आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भालके यांच्या विठ्ठल कारखान्याला विनाअट आर्थिक मदत केली. या मदतीची परतफेड म्हणून भालकेंनी भाजपच्या उमेदवाराला छुपी मदत केली असल्याचा गौप्यस्फोट आमदार परिचारक यांनी जाहीर सभेत केला.
परिचारक पुढे म्हणाले की, भालके हे 10 वर्षं आमदार आहेत, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 10 लाखांचा देखील अतिरिक्त निधी विकासकामांसाठी आणलेला नाही. याउलट मुख्यमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षांत 500 कोटीहून अधिकचा निधी पंढरपूर विकासकामांसाठी दिला आहे. विरोधातील आमदार निवडून द्यायचा का सत्तेतील आमदार निवडून द्यायचा हे आता मतदारांनी ठरविण्याची वेळ आली आहे. तेव्हा जागृत मतदारांनी शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना निवडून देण्याचे आवाहन परिचारक यांनी यावेळी केले.


























































