कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाहक त्रास; शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा आरोप

कोणताही गुन्हा किवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला आणि आमच्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. एका प्रकरणातून जामीन मिळाला की दुसऱया प्रकरणात तत्काळ जाणीवपूर्वक गुंतवले जात आहे याकडेही सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱया छळवणुकीचा पाढा वाचला. या पत्रात सरनाईक म्हणतात, केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे ‘माजी खासदार’ झालेल्या नेत्याकडून बदनामी सुरू आहे. कोणताही गुन्हा किवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाहक प्रचंड त्रास सुरू आहे. आम्हाला टार्गेट करतानाच आमच्या कुटुंबीयांवरही सतत आघात होत आहेत. खोटेनाटे आरोप केले जात आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तत्काळ जाणीवपूर्वक दुसऱया केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱया केसमध्ये गुंतवणे, अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करत आहेत. याकडे सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

युद्धात लढत असताना अभिमन्यूसारखे लढण्यापेक्षा किवा कर्णासारखे बलिदान देण्यापेक्षा धनुर्धारी अर्जुनासारखे लढावे असे मला वाटते. त्यामुळे कोणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई कुटुंबासह गेले सात महिने लढत आहे, असेही सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे.

साहेबतुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास

साहेब, तुमच्या नेतृत्वावर आमचा अढळ विश्वास आहे. कोरोनासारख्या जागतिक महासंकटास आपण ज्या पद्धतीने तोंड दिले, प्रचंड मेहनत घेऊन कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचा सांभाळ केला आहे. त्याचमुळे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आपण पहिल्या क्रमांकावर आहात. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार हे शिवसेनाप्रमुखांना दिलेले वचन पूर्ण झाले आहे आणि या पदाला आपण न्याय दिला आहे आणि देत आहात, अशी भावना सरनाईक यांनी व्यक्त केली.

पत्रात सरनाईक पुढे काय म्हणतात?

या पत्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपबद्दलचे मतही सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेवून फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असे त्यांना वाटत आहे. काँग्रेस पक्ष तर एकला चलो रेची भूमिका घेत आहे.

सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच जुळवून घेतलेले बरे. पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधीच जुळवून घेतले तर बरं होईल, त्याचा फायदा शिवसेनेला भविष्यात होईल.

आपली प्रतिक्रिया द्या