सारेच चेंडू कुरतडतात, पण पाकिस्तानी जास्त; प्रवीणचा गौप्यस्फोट

चेंडूंना रिव्हर्स स्विंग करण्यासाठी हिंदुस्थानसह साऱयाच देशांचे वेगवान गोलंदाज कमी जास्त प्रमाणात बॉल टेंपरिंग म्हणजेच चेंडू कुरतडतात, पण चेंडू कुरतडण्यात पाकिस्तानचे गोलंदाज सर्वात पुढे असल्याचा गौप्यस्फोट केलाय हिंदुस्थानचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने.

बॉल टेंपरिंग प्रकारात पाकिस्तानचे गोलंदाज सर्वात पुढे आहेत. चेंडूला स्विंग करण्याच्या कलेसाठी सर्वच देशातील खेळाडू चेंडूला कुरतडतात, पण पाकिस्तानचे गोलंदाज जरा जास्तच करतात. ते चेंडूला एका बाजूने कुरतडतील, परंतु चेंडूला स्विंग करण्याची कला यायला हवी. जर मी चेंडू कुरतडून कुणाला देतो, पण त्याला रिव्हर्स स्विंगचे कौशल्य यायला तर हवे ना. हे त्यांनी शिकायला हवे, असे प्रवीण कुमार आपल्या एका मुलाखतीदरम्यान म्हणाला.

आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱया प्रवीणला रिव्हर्स स्विंगबाबत विचारण्यात आले होते. या मुलाखतीत त्याने पाकिस्तानचे गोलंदाज खोटारडे असल्याचेही म्हणाला. रिव्हर्स स्विंग सर्वप्रथम सरफराझ नवाजने केले. त्यानंतर त्यांनी इम्रान खान यांनी शिकवले. त्यांनी वसीम अकरम आणि वकार युनूसला याचे धडे दिले. पुढे आकिब जावेद, मोहम्मद आसिफ, आमीर यासारख्या गोलंदाजांनी रिव्हर्स स्विंगची कमाल दाखवली.

क्रिकेटमध्ये चेंडूला कुरतडणे किंवा घासणे एक मोठा गुन्हा मानला जातो. याप्रकरणी 2018 साली दक्षिण आफ्रिका दौऱयात ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंना चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. या खेळाडूंनी सॅण्डपेपरचा वापर करून चेंडूला एका बाजूने घासले होते.