धक्कादायक! काँग्रेसच्या ‘जनसंघर्ष यात्रे’त गर्दी जमविण्यासाठी अभियांत्रिकीची पूर्वपरीक्षा रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमनेर

काँग्रेसच्या वतीने ‘जनसंघर्ष यात्रे’चा उत्तर महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे. मंगळवारी ही यात्रा संगमनेरात आली. मात्र, या यात्रेला गर्दी जमविण्यासाठी चक्क अभियांत्रिकीची पूर्वपरीक्षा रद्द करण्यात आली होती. शिवाय गणवेश आणि ओळखपत्राशिवाय ‘अमृतवाहिनी’ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना यात्रेत सहभागी होण्याचे फर्मान सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा आदेश व्हॉट्सऍपद्वारे दिल्याचा क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. दरम्यान, या प्रकारावरून ‘एनएसयूआय’ व ‘अभाविप’ या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

भाजप सरकारविरोधात काँग्रेसने ‘जनसंघर्ष यात्रा’ काढली असून, पश्चिम महाराष्ट्रानंतर या यात्रेचा उत्तर महाराष्ट्राचा टप्पा सुरू आहे. मंगळवारी संगमनेरात ही यात्रा येणार होती. यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरील मालपाणी लॉन्समध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या यात्रेत सहभागी होण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. यासाठी चक्क विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षाही रद्द करण्यात आल्याचे व्हॉट्सऍपद्वारे बजावलेल्या नोटिशीत म्हटले होते. या यात्रेत महाविद्यालयाचा गणवेश, तसेच ओळखपत्र न घालता सहभागी होण्यास सांगितले होते. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी अशा आशयाचे मेसेज व्हॉट्सऍपवरून विद्यार्थ्यांना पाठविले होते. याचा क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

दोन विद्यार्थी संघटनांमध्ये जुंपली
संगमनेरच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने या संदर्भात एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. परीक्षा रद्द करून संघर्ष यात्रेची गर्दी फुगविणे हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांना सक्तीने राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्यास भाग पाडणे घातक असल्याचे ‘अभाविप’ने म्हटले आहे. मात्र, असे काहीही झाले नसून, विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने या यात्रेत सहभागी झाल्याचे ‘एनएसयूआय’चे जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा यांनी सांगितले आहे. तालुक्यातील सर्वच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या यात्रेत सहभागी होण्यासाठी ‘एनएसयूआय’च्या वतीने आव्हान करण्यात आले होते, असेही पापडेजा म्हणाले.

भाजपवाल्यांनो, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा!
देशात फक्त घोषणांचे कारखाने असलेल्या भाजप सरकारकडे विकासासाठी पैसा नाही. शेतकरी, कामगार, महिला, युवक, आदिवासी, अल्पसंख्याक त्रस्त असून, ‘भाजपवाल्यांनो, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा!’ अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केली. मालपाणी लॉन्स येथे आयोजित काँग्रेसच्या जनसंघर्ष सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार भाऊसाहेब कांबळे, डॉ. सुजय विखे, दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, बाबा ओहोळ, विश्वास मुर्तडक उपस्थित होते.