मुंबईतील नदी-नाल्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण; अल्पवयीन मुलांना राबवणार्‍या कंत्राटदारांना नोटीस

443

मुंबईत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून लवकरच याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. पालिका अधिकार्‍यांनी याबाबत गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांना ही माहिती दिली. पावसाळापूर्व कामे वेगाने करून मान्सून सुरू होण्याआधी पूर्ण करा, असे निर्देश यावेळी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी संबंधित अधिकार्‍यांना यावेळी दिले. नालेसफाईच्या कामासाठी अल्पवयीन मुलांना राबवणार्‍या कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनाने स्पष्ट केले.

नालेसफाईची कामे करताना काही कंत्राटदारांनी अल्पवयीन मुलांना नेमल्याच्या काही तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन संबंधित कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याला त्यांनी एका आठवड्यात समाधानकारक उत्तर दिले नाही तर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, पालिका आयुक्त चहल यांनी पावसाळापूर्व सर्व कामांचा तपशील संबंधित अधिकार्‍यांकडून जाणून घेतला. यावेळी चहल म्हणाले की, नदी-नाले यामधील गाळ काढण्याची कामे करताना करताना अडथळ्यांची मुख्य ठिकाणे (बॉटलनेक) तातडीने व एका आठवड्यात स्वच्छ होतील, याकडे लक्ष द्यावे. मिठी नदीचे काम 60 टक्के पूर्ण झाले असल्याची बाब समाधानकारक आहे. मात्र, पर्जन्यवृष्टीच्या कालावधीत मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडणार नाही, अशारीतीने आवश्यक ती सर्व कामे पूर्ण केली पाहिजेत. नालेसफाईप्रमाणेच रस्ते बांधकाम, रस्ते दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती यांची सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. कोणत्याही स्थितीत पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिले. कोविड 19 कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्व कर्मचारी, कामगार यांना जॅकेट, गमबूट यांच्यासह मास्क, हातमोजे इत्यादी साधनांचा पुरवठा संबंधित कंत्राटदारांमार्फत केला जात असून सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्स) राखण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी जास्तीत संयंत्रे उपलब्ध करून कामे करण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या