पृथ्वीच्या विनाशाबाबत करण्यात आलेल्या भविष्यवाणी…वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक धर्मग्रंथानुसार पृथ्वीच्या विनाशाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. पृथ्वीचा विनाश अटळ असल्याचे सर्व धर्मांनी मान्य केले आहे. तसेच अनेक संशोधक आणि शास्त्रज्ञांनीही पृथ्वीच्या विनाशाबाबतचे अंदाज वर्तवले आहेत. आतापर्यंत पृथ्वीच्या विनाशाबाबत करण्यात आलेल्या सर्वच भविष्यवाणी फोल ठरल्या आहेत. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार चार युगानंतर प्रलय येतो आणि पृथ्वीचा अंत होतो, असे सांगण्यात येते. मात्र, आतापर्यंत करण्यात आलेल्या पृथ्वीच्या विनाशाच्या भविष्यवाणी रंजक आहेत.

आतापर्यंत ज्ञात असलेल्या भविष्यवाणीपैकी पृथ्वीच्या विनाशाचे पहिले भाकीत जर्मनीचे ज्योतिषी जोहान्स स्टोऑफलर यांनी केले होते. त्यांच्या भविष्यवाणीनुसार 25 फेब्रुवारी 1524 रोजी पृथ्वीचा विनाश होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पाण्यात बुडून जगबुडी होणार असल्याचे त्यांचे भाकीत होते. त्याचदिवशी समुद्राला मोठी भरती आली आणि अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यांची पृथ्वीच्या विनाशाची भविष्यवाणी फोलच ठरली. तैवानचे धर्मगुरु मिंग चेन याने धर्मग्रंथाच्या आधारे 25 मार्च 1988 रोजी देव पृथ्वीवर येऊन पृथ्वीच्या अंत करणार असल्याचे भाकीत केले होते. त्याचप्रमाणे अमेरिकेतील धार्मिक ग्रंथाचे अभ्यासक मार्शल एप्पलव्हाईट यांनी 1997 मध्ये परग्रहावरील अंतराळयान पृथ्वीला धडकून पृथ्वीचा विनाश होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यांचे भाकीत फोल ठरल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली होती. 2011,2012,2016 या वर्षातही पृथ्वीचा विनाश होण्याची भविष्यावाणी करण्यात आली होती. 21 डिसेंबर 2012 नंतरची तारीख मायासंस्कृतीचा दिनदर्शिकेत नसल्याने ही जगाच्या अंताची तारीख असल्याचे सांगण्यात येत होते. या भविष्यवाणीची, माया संस्कृतीची आणि दिनदर्शिकेची मोठ्या प्रमाणात जगभरात चर्चा झाली होती. तसेच एखादा धूमकेतू पृथ्वीजवळून जात असतानाही असे दावे करण्यात येतात. मात्र, आतापर्यंत पृथ्वीच्या विनाशाचे करण्यात आलेले सर्व दावे फोल ठरले आहेत.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही पृथ्वीच्या विनाशाच्या भाकीतांची पुन्हा चर्चा होत आहे. प्रसिद्ध भविष्यवेत्ता नेस्टोदेमस याने 2020 हे वर्ष विनाशाचे ठरणार असल्याचे भाकीत 465 वर्षांपूर्वी केले होते. जगावर फास आवळणारी रोगराई जगभरात पसरेल. त्यामुळे अनेकांचे बळी जातील, त्या महामारीला आवर घालणे कठीण जाईल, असेही नेस्टोदेमस यांनी भाकीतात म्हटले होते. ही साथ जशी अचानक येईल, तशीच अचानक नष्टही होईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. कोरोनाबाबतचे नेस्टोदेमसचे भाकीत आतापर्यंत खेर ठरले आहे. आता ही साथ नष्ट कशी होईल ,त्याबाबत हे भाकीत खरे ठरेल का अशी चर्चा आहे.