
गर्भवती, आजारी, दिव्यांग अशा संवेदनशील घटकातील कर्मचाऱयांना निवडणूक कामातून लवकरच दिलासा मिळणार आहे. पालिकेने निवडणूक प्रक्रियेदरम्यान अशा कर्मचाऱयांना लावलेली निवडणूक डय़ुटी रद्द करून घेण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी कर्मचाऱयांना याबाबत पालिकेकडे अर्ज करावा लागणार आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून या कामासाठी पालिकेला सुमारे 75 हजार कर्मचाऱयांची गरज भासणार आहे. सोमवारपासून कर्मचाऱयांना या कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या कामाला नकार देणाऱया कर्मचाऱयांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही पालिका प्रशासनाने दिला असतानाच निवडणुकीच्या कामांचे वाटप करताना प्रशासनाने माणुसकी दाखवावी अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केली होती. अपंग शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱया महिला तसेच गंभीर आजार असणाऱया शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांना निवडणूक डय़ुटी रद्द करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी केली होती. पालिकेने याची दखल घेत माणुसकीचा दृष्टिकोन दाखवत अशा कर्मचाऱयांना या कामातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. संवेदनशील घटकांमधील सर्वच कर्मचाऱयांना निवडणुकीचे काम रद्द करण्यासाठी अर्ज करण्याची संधी मुंबई महापालिका प्रशासनाने दिली असून मस्जिद बंदर येथील पालिकेच्या निवडणूक कार्यालयात यासंबंधीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
प्रत्येक निवडणुकीवेळी सुविधा
सर्वच विभागातील ज्या कर्मचाऱयांना निवडणुकीचे काम देण्यात आले आहे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात काही गंभीर बाबी असतील तर त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करून अर्ज करता येणार आहे. ही सुविधा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी दिली जाते तशी संधी यंदाही देण्यात आली आहे. कर्मचाऱयांनी सादर केलेल्या अर्जाचा आणि प्रमाणपत्राचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे पालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकऱयांनी सांगितले.




























































