
महायुती सरकार प्रगत महाराष्ट्राच्या मोठमोठय़ा बाता मारत असताना दुसरीकडे अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. आशा संतोष किरंगा (24) या गर्भवती मातेने आपल्या पोटातील बाळाला वाचवण्यासाठी पतीसोबत जंगलातून तब्बल सहा किलोमीटर पायपीट केली, परंतु वेळेत उपचार न मिळाल्याने आधी बाळाचा पोटातच मृत्यू झाला आणि त्यानंतर काही वेळातच मातेनेही अखेरचा श्वास घेतला. या घटनेने ‘स्टील हब’ म्हणून नावारूपास येत असलेल्या गडचिरोलीतील अपुऱया पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आलदंडी टोला या गावात प्रसूतीची कोणतीही सोय नाही. वेळेवर मदत मिळावी यासाठी आशा किरंगा ही गर्भवती माता 1 जानेवारी रोजी पतीसह जंगलाच्या वाटेने सहा किलोमीटरची पायपीट करत पेठा येथील बहिणीच्या घरी निघाली होती, मात्र अवजडलेल्या अवस्थेतील पायापीटमुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊन त्यांना तीव्र प्रसववेदना सुरू झाल्या. तातडीने त्यांना हेडरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी सिझेरियनचा निर्णय घेतला पण तोपर्यंत उशीर झाला होता. पोटातच बाळाचा मृत्यू झाला होता आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे काही वेळातच आशा यांचीही प्राणज्योत मालवली.
मृत्यूनंतरही फरफट थांबेना
प्रशासकीय असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे, मृत्यूनंतरही या माय-लेकांच्या पार्थिवाची फरफट थांबली नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे स्त्रीरोगतज्ञ नसल्याचे कारण पुढे करत त्यांना पुन्हा 40 किलोमीटर लांब अहेरीला पाठवण्यात आले. जिवंतपणी नशिबी आलेली पायपीट मृत्यूपश्चातही उदासीन सरकारी व्यवस्थेच्या फेऱयात अडकल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
































































