
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. नगरविकास विभागाने मुंबईतील 227 प्रभागांसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेस मान्यता मिळाल्यावर प्रभाग आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार आहे.
प्रारूप प्रभाग रचनेवर 494 हरकती व सूचना नागरिकांकडून आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेऊन प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेले प्राधिकृत अधिकारी लवकरच अंतिम प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर करतील. निवडणूक आयोगाच्या मान्यतेने अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल असे समजते.
ऑक्टोबर अखेर मतदार यादी प्रसिद्ध
मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेनुसार विधानसभा मतदारसंघाच्या यादीची विभागणी करण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत पालिका निवडणुकीसाठीची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.
पालिका निवडणूक जानेवारीत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती तर जानेवारीत महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे.