जाती, पंथ, धर्म, कुटुंबाशिवाय आपली खरी ओळख भारतीय; स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे देशाला उद्देशून भाषण

जाती, पंथ, भाषा, क्षेत्रवाद, कुटुंब आणि आपले कार्यक्षेत्र अशी आपली ओळख असते. परंतु आपल्या या ओळखीशिवाय भारतीय नागरिक असणे हीच आपली खरी ओळख आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपले मत व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला उद्देशून भाषण केले. त्या वेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी राष्ट्रपतींनी स्वातंत्र्य दिनाच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. सर्व देशवासी मोठय़ा उत्साहात ‘अमृत महोत्वस’ साजरा करीत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

हिंदुस्थानातील सर्व लोक स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी करीत आहेत. स्वातंत्र्य दिन आपल्याला आठवण करून देतो की, आपण केवळ एक व्यक्ती नाही, तर आपण अशा एका महान जन-समुदायातील एक भाग आहोत… हा जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही नागरिकांचा समुदाय आहे. मी सर्व देशवासीयांना विनंती करते की, महिला सशक्तीकरणाला प्राथमिकता द्या. आपल्या मुली आणि बहिणी मोठय़ा धैर्याने प्रत्येक आव्हानाचा सामना करीत आयुष्यात पुढे जायला हव्यात. आज प्रत्येक क्षेत्रात महिला योगदान देत आहेत. महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणावर लक्ष दिले जात आहे, हे पाहून मला आनंद होत आहे, असेही त्या म्हणाल्या.