इराणचा आरपार हल्ला ट्रम्प विकृत आणि माथेफिरू! अध्यक्ष पेजेश्कियान यांच्यासह 1 कोटी 40 लाख इराणी लोकांचा देशासाठी बलिदानाचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 38 दिवसांपासून सुरू असलेले इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध अत्यंत खतरनाक वळणावर पोहोचले आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास एका रात्रीत संपूर्ण विनाश घडवू, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिली, तर इराणनेही ‘आर या पार’ची भूमिका घेतली. अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्यासह 1 कोटी 40 लाख इराणी लोकांनी देशासाठी बलिदानाचा निर्धार व्यक्त केला. ‘ट्रम्प हा विकृत आणि माथेफिरू माणूस आहे,’ असा जोरदार हल्ला मसूद यांनी चढवला. अमेरिकेच्या दहशतवादी सैन्याने मर्यादा ओलांडल्यास आम्ही हे युद्ध आखाती देशांच्या बाहेर नेऊ, असा इशारा इराणच्या लष्कराने दिला.

अमेरिका-इस्रायलच्या अफाट लष्करी शक्तीला चिमुकला इराण पुरून उरला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून इराणने अमेरिकेसह युरोपचे नाक दाबले आहे. हे नाक इराणच्या मुठीतून सोडवण्यासाठी ट्रम्प यांचा आटापिटा सुरू असून त्यासाठी त्यांनी इराणला मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंतची (हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी 5.30 वा.) मुदत दिली आहे. मात्र इराणने झुकण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अमेरिकेने निर्णायक हल्ल्याची धमकी दिली आहे. दोन्ही बाजू माघार घेण्यास तयार नसल्याने घनघोर युद्ध पेटण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे अवघ्या जगाचे टेन्शन वाढले आहे.

डेडलाइनआधीच खर्ग बेटावर हल्ला

होर्मुझवरून इराणला 48 तासांची डेडलाइन देणाऱ्या अमेरिकेने 12 तास आधीच इराणची लाइफलाइन असलेल्या खर्ग बेटावर हल्ला चढवला. खर्ग हे इराणी तेलाचे प्रमुख भंडार आहे. इराणमधील 90 टक्के तेलाची निर्यात या बेटावरून होते. या बेटावर अमेरिकेने बॉम्बवर्षाव केला. त्यामुळे इराण खवळला आहे. अमेरिकेने आमच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केल्यास सौदी अरेबियासह संपूर्ण आखात अंधारात जाईल, असा इशारा इराणने दिला.

…तर आखाताबाहेरील देशांवरही हल्ले

अमेरिकेच्या दहशतवादी सैन्याने मर्यादा ओलांडल्यास आम्ही हे युद्ध आखाती देशांच्या बाहेर नेऊ. आम्ही आतापर्यंत नागरी सुविधांवर हल्ले करणे टाळले आहे आणि यापुढेही करणार नाही. मात्र, नागरी सुविधांवर होणाऱ्या घृणास्पद हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास आम्ही मुळीच कचरणार नाही, असे ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने ठणकावले.

इराणी संस्कृतीच नष्ट करून टाकू – ट्रम्प

होर्मुझचा मार्ग इराणने खुला न केल्यास एका रात्रीत पूर्ण संस्कृतीच नष्ट करून टाकू. पुन्हा कधी ही संस्कृती दिसणार नाही. पुढचे काही तास हे आधुनिक इतिहासातील महत्त्वाचे तास असतील. इराणने माघार न घेतल्यास कधीही भरून न येणारा विनाश ओढवेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला, तर आता चेंडू इराणच्या कोर्टात आहे, असे सूचक वक्तव्य अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी केले.

अल्लाहची मर्जी असेल ते घडेल! – इराण

ट्रम्प यांच्या धमकीला इराणी दूतावासांनी तितकेच जबरदस्त उत्तर दिले. ‘तुमच्या तोंडात हे शब्द शोभत नाहीत. अमेरिकी जनतेला तुमची लाज वाटू लागलीय. हे सगळे थांबवा. अन्यथा, हजारो वर्षांचा इतिहास असलेला इराण तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना असा तडाखा देईल की तुम्ही कधीही विसरणार नाही. अल्लाहची मर्जी असेल तेच घडेल,’ अशी एक्स पोस्ट झिम्बाब्वेतील इराणी दूतावासाने केली. दक्षिण आफ्रिकेतील इराणी दूतावासाने मिनाबी येथील मुलींच्या शाळेवरील हल्ल्यानंतर उडालेल्या हाहाकाराचा व्हिडीओ शेअर केला. ‘हे चेहरे आठवा. ही चीड, या वेदना आठवा. आम्ही तुम्हाला सहजासहजी सोडणार नाही,’ असे इराणने अमेरिकेला ठणकावले.

इराण एकवटला! पूल आणि ऊर्जा प्रकल्पांभोवती मानवी साखळ्या

ट्रम्प यांनी इराणमधील पूल, ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्यानंतर इराणी जनता एकवटली आहे. लाखो नागरिक देशाचा झेंडा आणि नेत्यांचे पह्टो हाती घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी देशातील ठिकठिकाणचे ऊर्जा प्रकल्प आणि पुलांभोवती मानवी साखळी केली आहे. यात तरुणांसह महिला व मुलांचाही समावेश आहे.

चीन, रशियाकडून अमेरिकेचा गेम; संयुक्त राष्ट्रात होर्मुझचा प्रस्ताव रोखला

होर्मुझ मार्ग खुला करण्यासाठी ट्रम्प इरेला पेटलेले असताना चीन व रशियाने आज अमेरिकेचा गेम केला. होर्मुझ खुले करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आलेला प्रस्ताव रशिया व चीनने नकाराधिकार वापरत हाणून पाडला. बहरीनने हा प्रस्ताव आणला होता. बळाचा वापर करून हा मार्ग खुला करण्याचा मुद्दा सुरुवातीला प्रस्तावात समाविष्ट करण्यात आला होता. रशिया, चीन आणि फ्रान्सने त्यास आक्षेप घेतल्यानंतर हा मुद्दा वगळला. त्याऐवजी ‘संरक्षणाचे सर्व आवश्यक उपाय करण्याचा’ असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे हा प्रस्ताव  कमकुवत झाला होता. मात्र तोही रशिया व चीनने रोखून धरला.  परिषदेतील 15 पैकी 11 सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने, तर दोघांनी विरोधात मतदान केले. दोन सदस्य अनुपस्थित राहिले. मात्र स्थायी सदस्यांपैकी दोघांनी विरोध केल्याने प्रस्ताव बारगळला.