
अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगभरात तणाव निर्माण झाला आहे. हिंदुस्थानवर लादलेला टॅरिफ लागू करण्याची मुदत जवळ येत आहे. त्यामुळे निर्यातदार आणि उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. अमेरिका व्यापार करारासाठी दबाव टाकत आहे. तसेच टॅरिफही दुप्पट करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच दबावाची परिस्थिती निर्माण होणार आहे. मात्र, आपण त्याचा सामना करण्यास सक्षम आहोत. अमेरिकेच्या टॅरिफ दबावाला बळी पडणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच मोदी यांनी स्वदेशी वस्तूंच्या व्यापक वापर करण्याचे आवाहन केले.
आपले सरकार शेतकरी आणि लघु उद्योगांच्या हितांशी तडजोड करणार नाही. अमेरिकेच्या टॅरिफमुळे आमच्यावरील दबाव वाढू शकतो, परंतु आम्ही ते सहन करू. आपण त्याचा मुकाबला करण्यास सक्षम आहोत, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. व्यापार करारामुळे अमेरिका- हिंदुस्थानमधील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील शुल्क दुप्पट करून 50 टक्के केले आहे. त्यात हिंदुस्थानने रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर 25 टक्के अतिरिक्त शुल्काचा समावेश आहे. हिंदुस्थानने अमेरिकेच्या या निर्णयाला “अन्याय्य, अन्याय्य आणि अवास्तव” म्हटले आहे.
आपल्या देशातील लहान उद्योजक असोत, शेतकरी असोत किंवा पशुपालक असोत, त्यांचे हित देशासाठी सर्वोपरि आहे. आपले सरकार कधीही लहान उद्योजकांना, शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. कितीही दबाव आला तरी आपण सहन करण्याची आपली ताकद वाढवत राहू,” असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी स्वदेशी वस्तूंच्या व्यापक वापरावर भर दिला. आपण सर्वांनी फक्त ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी करण्याच्या मंत्राचे पालन केले पाहिजे. व्यावसायिकांनी त्यांच्या आस्थापनांच्या बाहेर एक मोठा बोर्ड लावावा, ज्यामध्ये असे लिहिले असेल की ते फक्त ‘स्वदेशी’ वस्तू विकतात,” असे ते म्हणाले.