
>>डॉ. चंद्रकांत लहरिया
कोविड-19 च्या महासंसर्गामुळे सर्वाधिक काळ शाळा, महाविद्यालये बंद असलेल्या देशांमध्ये हिंदुस्थानचा समावेश होतो आणि शाळा सर्वात शेवटी सुरू कराव्यात असेच नियोजन आहे. अर्थात बऱ्याच प्रयत्नांनंतर काही राज्यांनी शाळा सुरू करण्यास सुरुवात केली आहे; परंतु ही प्रक्रिया खूपच संथगतीने सुरू आहे आणि त्यातही अनेक किंतु-परंतु आहेत. राज्यांचे शाळा सुरू करण्याचे निर्णय संसर्ग विज्ञानातून मिळालेल्या शिकवणुकीपेक्षा अधिक व्यक्तिगत मते आणि व्यावहारिक बुद्धीतून घेण्यात आलेले दिसतात. उदाहरणार्थ, सर्वात लहान मुलांचे वर्ग (प्राथमिक विद्यालये) सर्वात आधी सुरू करायला हवेत, असे शास्त्रीय पुरावे सांगतात; परंतु आपल्याकडील बहुतांश राज्यांची वाटचाल बरोबर उलट दिशेने सुरू आहे. राज्ये मोठय़ा मुलांचे वर्ग आधी सुरू करीत आहेत आणि प्राथमिक शाळांचे वर्ग सर्वात शेवटी!
जगभरातून प्राप्त आकडेवारी सांगते की, सर्वच वयोगटांतील मुलांसाठी शाळा आता सुरू करायला हव्यात. कारण मुलांमध्ये कोविड संसर्गाचा धोका प्रौढांइतकाच असला तरी प्रौढांच्या तुलनेत गंभीर आजाराचा धोका मुलांमध्ये नगण्य असतो. याचे शास्त्रीय कारण असे की, मुलांमध्ये एसीई-2 रिसेप्टर्स पुरेशी विकसित झालेली नसतात. विषाणूला फुप्फुसांपर्यंत पोहोचण्यासाठी ही रिसेप्टर्सच सहाय्य करतात. त्यामुळे मुलांमध्ये संसर्ग झालाच तरी तो गंभीर स्वरूपाचा नसतो. याखेरीज शाळा सुरू केल्यास मुलांना संसर्गाचा धोका वाढत नाही याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. शाळा हे ठिकाण सुपरस्प्रेडर (जिथे प्रचंड प्रमाणात लोकसंख्येला संसर्ग होण्याचा धोका असतो) नाही. तसेच व्यक्तिगतरीत्या शिक्षण घेण्याचे फायदेही कितीतरी अधिक आहेत. त्यामुळे जुलै 2021 पर्यंत जगातील 175 पेक्षा अधिक देशांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मुख्य म्हणजे बारा वर्षांखालील मुलांचे लसीकरण करण्यास जगात कुठेही सुरुवात झालेली नसताना या शाळा सुरू झाल्या आहेत.
याउलट, आपल्याकडे मात्र लोक बहुतांश अशाच विचारांचे आहेत की, जेव्हा मुलांचे लसीकरण होईल तेव्हाच त्यांना शाळेत पाठविले पाहिजे. वस्तुतः शाळा सुरू करण्यासाठी लसीकरण ही पूर्वअट असू नये, असे जगभरातील तज्ञ सांगत आहेत. 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना काही देशांमध्ये लस दिली जात आहे, ती जोखीम कमी करण्यासाठी आणि त्यांना अन्य आजारांचा त्रास होऊ नये म्हणून. वास्तविक, मुलांमध्ये कोरोनाचा धोका नैसर्गिकरीत्याच कमी असतो. वयोगटानुसार काढण्यात आलेल्या जागतिक आकडेवारीनुसार, मध्यम ते गंभीर आजाराची शक्यता आणि मृत्युदर इंग्रजी वर्णमालेतील ‘जे’ अक्षरासारखी वळणदार असते. या वक्रामध्ये जन्मापासून 18 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांमध्ये प्रौढांच्या तुलनेत खूपच कमी जोखीम असते. त्याचबरोबर, 10 वर्षे वयाची मुले ही ‘जे’ अक्षराचा सर्वात तळाचा भाग असतात. सर्व वयोगटांतील व्यक्तींच्या तुलनेत त्यांना धोका सर्वात कमी असतो. त्यानंतर प्रत्येक बदलत्या वर्षाबरोबर जोखीम दोन्ही दिशांनी वाढत जाते. नऊ वर्षांपासून नवजात अर्भकापर्यंत आणि त्याचबरोबर 11 वर्षांपासून पुढे जसजसे वय वाढत जाईल, तसतसा धोका वाढतो. अशा प्रकारे जी मुले प्राथमिक शाळांमध्ये आहेत, म्हणजे सहा ते चौदा वयोगटातील आहेत, ती ‘जे’ वक्रातील आधाराच्या आसपास आहेत. म्हणजेच त्यांना कोरोनाचा धोका कमी आहे.
याबरोबरच आपण मुलांना असलेल्या अध्ययन-अध्यापनाच्या गरजेकडेही लक्ष द्यायला हवे. जी मुले प्राथमिक शाळेत, विशेषतः पहिल्या आणि दुसऱ्या इयत्तेत आहेत, नुकतीच शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत आणि वर्णमाला किंवा अंक शिकत आहेत, त्यांना व्यक्तिगत मार्गदर्शनाची आवश्यकता सर्वाधिक असते. अशा मुलांनी कॉम्प्युटर स्क्रीनवर किंवा मोबाईल स्क्रीनवर कमीत कमी वेळ राहावे, असा सल्लाही तज्ञ देतात. वरिष्ठ वर्गांमधील मुलांमध्ये स्वतःहून समजून घेण्याची, शिकण्याची क्षमता वाढलेली असत. शिक्षणाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्येच काही अडथळे आले, तर त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतात हे आपण समजून घेतले पाहिजे. या महत्त्वाच्या वर्षांमध्ये ‘लॉस ऑफ लार्ंनग’ म्हणजेच शिकण्याच्या प्रक्रियेचे नुकसान झाल्यास वरच्या वर्गांत गेल्यावर मुलांना विषयांचे आकलन योग्य प्रमाणात होत नाही. परिणामी, समजून घेण्याचा त्यांचा स्तर घसरू शकतो आणि शिकण्यासवरण्यातील त्यांचा उत्साहही मावळू शकतो. म्हणूनच प्राथमिक वर्गांमधील विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यास प्राधान्य द्यायला हवे. या मुद्दय़ाकडे आताच लक्ष दिले नाही तर मुळातच असलेली लिंगाधारित, सामाजिक-आर्थिक स्थितीवरील आधारित आणि भौगोलिक क्षेत्रावर आधारित शैक्षणिक विषमता या ‘लॉस ऑफ लार्ंनग’मुळे कितीतरी वाढेल.
शिक्षणाचे व्यक्तिगत आणि सामाजिक अशा दोन्ही स्वरूपाचे फायदे अनेक आहेत. चांगली नोकरी आणि कौटुंबिक उत्पन्नात वाढीसारखे त्याचे व्यक्तिगत फायदे आहेत, तर कार्यकुशल श्रमशक्ती, कार्य उत्पादकतेत वाढ आणि राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये योगदान असे सामाजिक लाभही आहेत. महामारीच्या काळात शाळा बंद असल्याचा परिणाम आपल्याला येणाऱया काळात दिसून येईल. आरोग्य आणि शिक्षण दोन्ही दृष्टिकोनांमधून पाहिल्यास महामारीमुळे सर्वाधिक नुकसान मुलांचे, हिंदुस्थानने कोविड-19शी संबंधित निर्णय घेताना माहिती, विज्ञान आणि संसर्ग विज्ञानाच्या अनुभवाचा अवलंब करण्याची संधी गमावली आहे परंतु जर आपल्या धोरणकर्त्यांनी मनात आणले तर शाळा सुरू करण्याच्या बाबतीत या वैज्ञानिक अनुभवांचा उपयोग केला जाऊ शकतो. आपले धोरणकर्ते यासाठी तयार आहेत का?





























































