
पाथर्डी तालुक्यातील जवळपास दोनशे प्राथमिक शिक्षकांचे विम्याचे तब्बल दहा हप्ते शिक्षण विभागाने न भरल्याने या सर्व शिक्षकांच्या पॉलिसी सध्या बंद पडल्या असून त्या पुन्हा सुरु करण्यासाठी आता पॉलिसी धारक शिक्षकांना दंड भरण्याची वेळी आल्याने शिक्षण विभागात नेमके चालले काय असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. तालुक्यात नऊशे प्राथमिक शिक्षक कार्यरत असून त्या पैकी 210 शिक्षकांनी आपल्या वेतनातूनच एलआयसीच्या विम्याचे हप्ते परस्पर कपात करून एल आय सी कडे जमा करा असे सांगितल्याने या विमाधारक शिक्षकांचे विम्याचे हप्ते शिक्षण विभाग एल आय सी कडे भरत असते मात्र मार्च 23 ते नोव्हेंबर 24 अशा दहा महिन्यांचे विम्याचे हप्ते शिक्षण विभागाने एलयसीकडे न भरल्याने सध्या या सर्व शिक्षकांच्या विमा पॉलिस्या या लॅप्स झाल्या आहेत. एखाद्या विमाधारक व्यक्तीने आपले विम्याचे सहा हप्ते सलग न भरल्यास ती पॉलिसी बंद होऊन विमाधारकांना त्या पॉलिसी चा लाभ मिळत नाही. सध्या ज्या शिक्षकांच्या पॉलिसी बंद पडल्या आहेत त्या पैकी एखादा शिक्षक दुर्दैवाने मृत झाला असता तर त्याच्या कुटुंबाला या विमा कवचाचा कोणताही लाभ मिळाला नसता. सुदैवाने अशी वेळ एकाही शिक्षकावर आलेली नसली तरीही मात्र या निमीत्ताने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण विभागातील काही अधिकारी एलआयसीच्या कार्यलयात गेले व त्यांनी या सर्व शिक्षकांच्या विम्याचे हप्त्याची रक्कम जमा करून घ्या अशी विनंती एलआयसीच्या अधिकाऱ्यांना केली मात्र दंड भरल्याशिवाय हे हप्ते भरून घेता येणार नाही असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितल्या नंतर आता शिक्षण विभागाने विमा धारक प्राथमिक शिक्षकांना तुम्हीच जाऊन दंडासह हप्ते भरा व त्याची पावती आम्हाला सादर करा अन तुम्ही भरलेल्या रकमेचा चेक घेऊन जा असे तोंडी आदेश दिल्याने सध्या विमाधारक शिक्षक विम्याचा हप्ता व दंड भरून आपल्या विमा पॉलिसेचे नूतनीकरण करून घेत असून ते करताना अनेकांना शंभर ते पाचशे रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.या पूर्वी कार्यरत असलेल्या एका गटशिक्षणाधिकाऱ्याच्या काळात सुद्धा असाच प्रकार घडला होता. त्या वेळी एका शिक्षकाचे निधन झाल्या नंतर मृत शिक्षकाच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. सध्या असा प्रकार घडला नसला तरीही या विषयवार मात्र सध्या शिक्षकांचे नेते का शांत बसून राहिले आहे ते समजू शकत नाही. शिक्षण विभागाचा कारभार सध्या चर्चेचा विषय ठरला असून 29 शिक्षकांच्या समायोजनेचा तिढा तब्बल तीन महिने सुटला नव्हता. हा तिढा सुटल्या नंतर आता चिंचपूर पांगुळ येथील शाळा शिक्षक बदली प्रकरणावरून चार दिवस बंद राहिली होती. ज्या शिक्षकांचे विम्याचे हप्ते थकले आहेत ते शिक्षक या विषयावर जाहीरपणे काही बोलत नसले तरीही एखादी दुर्घटना घडली तर काय असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.




























































