ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोना व्हायरसची लागण

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आता या कोरोना व्हायरसने ब्रिटनच्या शाही घराण्यात देखील प्रवेश केला आहे. राजघराण्याकडून एक पत्रक जाहीर करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 422 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. मात्र त्यांची पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र तरिही या दोघांनीही त्यांना त्यांच्या स्कॉटलंडमधील घरात विलग करून ठेवले आहे, असे शाही घराण्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. प्रिन्स यांना कोणामुळे कोरोनाची लागण झाली हे सांगणे कठिण आहे कारण ते दररोज शेकडो लोकांना भेटत असतात, असे सांगण्यात आले आहे. तसेच गेल्या काही दिवसांत प्रिन्स चार्ल्स यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

आतापर्यंत जगभरात चार लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 16 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख हून अधिक जण या आजारातून बरेही झाले आहेत. हिंदुस्थानात या आजाराचे 562 रुग्ण आढळले असून आतापर्यं 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वाधिक मृत्यू हे इटलीत झाले असून आतापर्यंत त्या देशात सहा हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या