प्रिन्स हॅरीने पत्नीसह सोडले राजघराणे;‘रॉयल हायनेस’ उपाधीही ठोकरली

1069

महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्याशी झालेल्या एका समझोत्यानुसार प्रिन्स हॅरी आणि त्यांची टीव्ही अभिनेत्री पत्नी मेगन मर्केल यांनी राजघराणे आणि परिवारातील ज्येष्ठत्व सोडल्यानंतर आता ‘रॉयल हायनेस’ ही उपाधीही ठोकरली आहे. आता ते राजघराण्याच्या सदस्यांसाठी असलेल्या सार्वजनिक कोषाचाही वापर करणार नाहीत. यानंतर आता ते कॅनडात आपला खासगी वेळ शांततेत घालवू शकणार आहेत. बंकिंगहॅम पॅलेसने शनिवारी ही घोषणा केली.

प्रिन्स हॅरी यांनी महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्याशी जवळपास एक आठवडा खासगी चर्चा केल्यानंतर राजघराणे सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. स्वतंत्र झाल्यानंतर प्रिन्स हॅरी आपल्या पत्नी व आठ महिन्यांच्या मुलासोबत ब्रिटन आणि उत्तर अमेरिकेत स्वच्छंदी जीवन व्यतीत करणार आहेत. हॅरी यांची आई प्रिन्सेस डायना यांनीही प्रिन्स चार्ल्स यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर ‘रॉयल हायनेस’ ही उपाधी सोडली होती.

आठवडाभराच्या चर्चेनंतर निर्णय

महाराणींनी त्यानंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, अनेक महिने केलेला विचारविनिमय आणि गेल्या आठवडय़ात केलेल्या चर्चेनंतर माझा नातू आणि त्याच्या पत्नीने एक मार्ग स्वीकारला. त्यांच्यावर गेल्या दोन वर्षांपासून नजर ठेवली जात होती. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार त्यांना स्वतंत्र जीवन जगू देण्यास आम्ही समर्थन देत आहोत. 93 वर्षीय महाराणींनी प्रिन्स हॅरी व मेगन यांच्यावर नजर ठेवत त्यांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ केल्याचे वृत्त देणाऱ्या वर्तमानपत्रांविरुद्ध हॅरी यांनी ऑक्टोबरमध्ये खटला भरला होता, पण वास्तविक ते खरे होते हे महाराणींनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या