गंभीर आजारातही कैद्यांची कोरोनावर मात, कारागृह प्रशासनाची सर्वोत्तम कामगिरी

380

आशिष बनसोडे | मुंबई

कोरोनाचा कहर सुरूच असताना कैद्यांच्या बाबतीत मात्र दिलासादायक वृत्त आहे. कारागृहात घुसखोरी केलेल्या कोरोनाला पद्धतीशरपणे ठेचून त्याला चार भिंतीच्या बाहेर हद्दपार करण्यात  कारागृह प्रशासनाला यश आले आहे. प्रशासनाने केलेल्या सर्वोत्तम उपाययोजनांमुळे गंभीर आजारातही कैद्यांनी कोरोनावर मात केली आहे.

दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने कारागृहांची तटबंदी तोडून आत प्रवेश केला होता. कैद्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने हाहाकार उडाला होता. पण वरिष्ठ अधिकारी व कारागृह प्रशासनाने वेळीच आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेतल्या. राज्यातील प्रत्येक कारागृहातील सर्व कैद्यांची कोविड तपासणी करण्यात आली. त्यात ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्या सर्व कैद्यांवर योग्य उपचार करण्यात आले. परिणामी मधुमेह, हदयविकार, क्षयरोग, फुप्फुसाचा गंभीर आजार असतानाही पॉझिटिव्ह झालेले कैदी कोरोनावर मात करू शकले. कोरोनाला हद्दपार करण्यात सर्वच कारागृहे जवळपास यशस्वी झाली असून कोरोनाच्या बाबतीत कैदी, कर्मचारी आणि प्रशासन भयमुक्त झाले आहेत.

कारागृहामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काढू नये म्हणून उच्च स्तरीय समितीच्या शिफारशीनुसार जवळपास दोन हजार 892 कैद्यांना जामिनावर सोडून देण्यात आले.

आतापर्यंत चार हजार 916 कैद्यांची कोक्हिड तपासणी करण्यात आली. त्यापैकी 862 जणांना कोरोनाची लागण झाली होती. पण 630 कैदी ठणठणीत बरे झाले आहेत. तर केवळ चार कैदयांचा कोरोनाने मृत्यू झाला.

कैद्यांबरोबर कारागृहात कार्यरत असलेल्या एक हजार 346 कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 275 कर्मचार्‍यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र 226 कर्मचारी कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

स्मार्टफोन, कॉईन बॉक्सच्या माध्यमातून संपर्क

कारागृहांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने कैद्यांबरोबर त्यांच्या कुटूंबियांमध्ये घबराटीचे वाताकरण निर्माण झाले होते.पण कोरोनाच्या जाळयातून कैद्यांना सुखरूप बाहेर काढण्याबरोबर कैदी आणि त्यांच्या कुटूंबियांमध्ये संवाद रहावा, एकमेकांची ख्यालीखुशाली जाणता यावी  यासाठी कारागृह प्रशासनाने स्मार्टफोन आणि कॉईन बॉक्स फोनची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांच्याशी स्मार्टफोनने व्हिडीयो कॉलद्वारे संपर्क साधून कैद्यांना बोलू दिले जाते. तसेच ज्यांच्या कुटुंबियांकडे स्मार्टफोन नाही अशांशी कॉईन बॉक्स दवारे संपर्क साधून बोलू दिले जात आहेत. सध्यस्थितीत राज्यातील कारागृहांमध्ये एकूण 65 कॉईन बॉक्स आणि 61 स्मार्टफोनची सुविधा कार्यरत आहे.

दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने कारागृहांमध्ये शिरकाव केला होता. पण आम्ही वेळीच आवश्यक उपाययोजना हाती घेत कैद्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली. म्हणूनच वेळीच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबर कैद्यांना कोरोनामुक्त करण्यात आम्हाला यश आले. यापूढेही कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार असून कुठलीही तडजोड केली जाणार नाही. –  दिपक पांण्डये, (विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह)

आपली प्रतिक्रिया द्या