कारागृहे तुडुंब भरली, कैद्यांची दयनीय अवस्था, प्रस्तावित कारागृहे कधी उभारणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यातील सर्वच्या सर्व कारागृहे कैद्यांनी अक्षरशः तुडुंब भरली आहेत. प्रत्येक बॅरेक खचाखच भरलेली असल्याने कैद्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता नवीन कारागृहांची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. आठ ठिकाणी नवीन कारागृहे उभारण्याचे प्रस्तावित आहे, पण त्यांच्या उभारणीला मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यभरात लहानमोठी धरून तब्बल 60 कारागृहे आहेत. या सर्व कारागृहांची एकूण क्षमता 24 हजार 722 कैद्यांना ठेवण्याची आहे. परंतु सद्यस्थितीत या कारागृहांमध्ये मिळून 43 हजार 40 कैदी बंदिस्त आहेत. सर्वाधिक कैदी हे पुण्याच्या येरवडा कारागृहात असून त्यानंतर ठाणे, मुंबई, जळगाव येथील कारागृहांमध्ये आहे. कैदी कमी होण्याऐवजी त्यात दिवसागणिक वाढच होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त संख्या होत असल्याने कैद्यांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. आहे ती जागा अपुरी पडत असल्याने कैद्यांचे नियोजन करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनादेखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी नवीन कारागृहांची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.

– मुंबईसाठी पर्याय म्हणून नवी मुंबईतील तुर्भे येथील मौजे मंडाले तसेच पालघर, बारामती, हिंगोली, भुसावळ, अलिबाग, गोंदिया आणि नगर येथील नारायण डोह गावात नवीन कारागृह उभारण्यासाठी कारागृह विभागाला जमीन उपलब्ध झाल्या आहेत. कागदोपत्री या जागा उपलब्ध असल्या तरी प्रत्यक्षात उभारणी कधी होणार, असा सवाल काही अधिकारी उपस्थित करतात. नवीन कारागृहे उभारली तर ते सोयीचे ठरेल असेही अधिकारी- कर्मचारी सांगतात.

कैद्यांचा आलेख वाढतोय, पण अधिकारी व कर्मचारी वाढेना

आधीच्या तुलनेत बदलत्या काळानुसार कारागृहांमध्येदेखील आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत. असे सर्व होत असताना तसेच कैद्यांची संख्या वाढत असताना कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱयांची संख्या मात्र वाढत नसल्याचे चित्र आहे. परिणामी आहे त्या अधिकारी-कर्मचाऱयांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.