संचित रजेवर गेलेला कैदी फरार, शाहुपुरी पोलिसांत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा शहरातील माची पेठ परिसरात 2017 मध्ये झालेल्या खून प्रकरणात शिक्षा भोगत असताना संचित रजेवर कळंबा कारागृहातून बाहेर आलेला कैदी रजा संपल्यानंतर परत कारागृहात न गेल्याने त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय धोंडीराम कोकरे (रा. घाणेकर चौक, मंगळवार पेठ, सातारा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी कळंबा कारागृहाचे कर्मचारी दिलीप सर्जेराव पोवार यांनी फिर्याद दिली आहे.

माची पेठ परिसरात 2017 मध्ये झालेल्या खून प्रकरणात अजय कोकरे याला सातारा शहर पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्या गुह्याचा तपास करून पोलिसांनी त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीत सरकारी वकिलांचा युक्तिवाद व महत्त्वपूर्ण साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने 1 एप्रिल 2020 रोजी कोकरेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून कोकरे कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता.

कोकरेला 45 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आल्याने तो कारागृहाबाहेर आला होता. त्याची संचित रजा संपल्यानंतर त्याने 12 जून 2021 रोजी कारागृहात हजर होणे बंधनकारक होते. मात्र, कोकरे तेव्हापासून फरारी झाला असून, कारागृहात हजर झाला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार मोहन चव्हाण तपास करत आहेत.