
आशिष बनसोडे । मुंबई
कारागृह म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते खडी फोडणारे कैदी. पण प्रत्यक्षात चित्र वेगळे असून पुणे आणि चेन्नई कारागृहातील कैद्यांची कलाकुसर तर हिंदुस्थानसह अमेरिका आणि युरोपमध्ये जबरदस्त वाहवा मिळवत आहे. दोन्ही कारागृहांतील कैदी ‘इनमेट’या ब्रॅण्डने उच्च प्रतीचे चप्पल, सॅण्डल आणि शूज बनवत असून हा ब्रॅण्ड देशविदेशातील नागरिकांच्या पसंतीस पडू लागला आहे. याची मागणीदेखील वाढू लागली आहे.
राज्य कारागृह विभागाच्या वतीने कैद्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. बेकरी पदार्थ, इलेक्ट्रिक वस्तू, टेबल-खुर्च्या आदी उत्पादने कैद्यांकडून बनवून घेतली जातात. पण पुण्यातील येरवडा आणि चेन्नईतील पुझल मध्यवर्ती कारागृहातील 250 कैद्यांच्या कारागिरीचा सध्या जबरदस्त बोलबाला आहे. हे कैदी ‘इनमेट’ या ब्रॅण्डच्या नावाने उच्च प्रतीच्या चप्पल, सॅण्डल आणि शूज बनवून देत आहेत. या चप्पल आणि शूजला अमेरिका आणि युरोपमध्ये चांगली पसंती मिळत आहे. टरगल वर्क्स प्रा. लि. या 2017 साली स्थापन झालेल्या कंपनीने येरवडय़ातील 150 कैद्यांना फुटवेअर बनविण्याचे प्रशिक्षण दिले. तेव्हापासून सुरू झालेल्या या कामाने आता चांगलीच उचल घेतली आहे. सुरुवातीला 250 फुटवेअर बनवले जात होते, पण सद्यस्थितीत देशविदेशात 30 ते 35 हजार फुटवेअरची विक्री केली जात आहे. टरगल कंपनीमार्फत फुटवेअरची ऑर्डर स्वीकारली जाते. मग कच्चा माल पुरवून कैद्यांकडून मागणीनुसार दर्जेदार फुटवेअर बनवून घेतले जातात. वेबसाइट तसेच विविध ब्रॅण्डच्या माध्यमातून विविध प्रकारचे आणि हव्या त्या क्वालिटीचे फुटवेअर बनवून दिले जातात, असे टरगल कंपनीचे प्रमुख आणि कैद्यांना प्रशिक्षण देणारे दिवेश मेहता यांनी सांगितले.
कैद्यांसाठी हा चांगला उपक्रम असून त्यांना रोजगाराच्या दृष्टीने एक कलाकुसर शिकण्यास मिळत आहे. या कामातून त्यांना पैसेदेखील मिळतात. शिक्षा पूर्ण करून बाहेर गेल्यानंतर त्यांना चांगल्या कंपनीत किंवा स्वतःचे चपलांचे दुकानदेखील सुरू करता येईल, असे कारागृह विभागाच्या एका अधिकाऱयाने सांगितले.
पाच-सहा वर्षे शिक्षा शिल्लक त्यांना प्रशिक्षण
- ज्या कैद्यांच्या शिक्षेची मुदत पाच ते सहा वर्षे शिल्लक आहे अशा ठरावीक कैद्यांना फुटवेअर बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना आवश्यक साहित्य आणि कच्चा माल पुरवला जातो. मग कैदी अप्रतिम फुटवेअर बनवतात.
- प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षा भोगून बाहेर आलेल्या तिघा कैद्यांना आग्रा येथील कंपनीत नोकरीदेखील मिळवून दिली होती, असेही मेहता यांनी सांगितले.
- येरवडा कारागृहात 150 तर चेन्नई येथील कारागृहात 100 कैदी फुटवेअर बनविण्याचे काम करीत आहेत. चेन्नई येथे काही दिवसांपूर्वीच हे काम सुरू करण्यात आले आहे.































































