
शिर्डीतील खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आरोपीने पोलिसांची नजर चुकवून पळ काढला. समीर अक्रम शेख (रा. शिर्डी) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर शेख हा सराईत गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या एका खून प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोपरगाव येथील तुरुंगात त्याला ठेवण्यात आले होते. कोठडीत त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी दोन कर्मचारीही तैनात होते. तरीही शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तो पोलिसांची नजर चुकवून पळून गेला.

























































