
>> डॉ. प्रीतम भि. गेडाम
जन्मापासून मुलांची योग्य काळजी, संगोपन, सुसंस्कृत वागणूक, दर्जेदार शिक्षण आणि शुद्ध आचरण यातूनच तरुणांमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि प्रशासनाकडून युवांसाठी योग्य उपाययोजना व त्यावर अंमलबजावणी करणे हे चांगल्या सरकारचे उद्दिष्ट असते, जेणेकरून युवांना शिक्षणानुरूप नोकरी आणि व्यवसायाच्या चांगल्या संधी मिळतील. तरच युवाशक्ती स्वतःला सक्षम सिद्ध करून देशाला जागतिक महासत्ता बनविण्यात प्रभावी ठरेल, अन्यथा हीच युवाशक्ती गैरसोयी, समस्या आणि संघर्षामुळे विनाशाचे कारणही ठरू शकते.
सध्या आपल्या देशात वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, राजकीय हस्तक्षेप, गुन्ह्यांचा वाढता ग्राफ, अमली पदार्थांचे व्यसन, फसवणूक, नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश, भेसळ, सोशल मीडियाचे व्यसन, गैरव्यवहार, असंस्कृत आचरण, असभ्य भाषेचा वापर, ताण, प्रदूषण आणि स्वार्थामुळे जीवन संघर्षमय झाले आहे. बेरोजगारीची वास्तविकता अशी आहे की, मोठय़ा संख्येने उच्चशिक्षित तरुणही चतुर्थ श्रेणीच्या पदाकरिता धडपडताना दिसतात. दरवर्षी मोठय़ा संख्येने कर्मचारी निवृत्त होतात, परंतु अनेक विभागांमध्ये अनेक दशकांपासून नवीन भरती होताना दिसत नाही आणि दुसरीकडे दरवर्षी शिक्षण निश्चितच महाग होत आहे. शासनावर कर्जाचा डोंगर वाढतोय, सामाजिक समस्या आणि रोग झपाटय़ाने वाढत आहेत. पर्यावरणाचा नाश झाल्यामुळे नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी मोठय़ा प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होते आणि देशाचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होते.
अनेकदा पालक मुलांसमोर वडिलधाऱयांशी अमानुषपणे वागतात, पण मुलांकडून स्वतःसाठी आदर्श वागणुकीची अपेक्षा करतात. मुलांना चांगले पोषक वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे आणि तरुणांना चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज देशात काही मुद्दे नवनवीन विषयांना जन्म देत आहेत, जसे की – प्रत्येक धर्म आपल्याला शांतता, एकात्मता आणि मानवतेचा संदेश देतो. मग लोकांच्या मनात लोभ, द्वेष का? समाजात माणुसकीला काळिमा फासणारी दुर्घटना पुनः पुन्हा का? तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढत आहे? लोक शिक्षित आणि जागरूक असतील तर फसवणूक आणि अत्याचार का वाढत आहेत? लोक छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून आपला संयम का गमावतात आणि अयोग्य पावले का उचलतात? पालक आपल्या मुलांची प्रशंसा करत त्यांना चांगल्या सुखसुविधा देत आहेत, मग समाजात मानवी मूल्यांची होळी का केली जात आहे?
जगात फक्त तेच देश विकसित झाले आहेत, जिथे युवा शक्तीला दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि उत्तम रोजगाराचे पर्याय उपलब्ध आहेत. आजही आपल्या देशात मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर सुरू आहे. खेड्यातील लोक शहरात जातात, शहरातील लोक महानगरात जातात आणि महानगरातील लोक चांगल्या पर्यायांच्या शोधात परदेशात जातात. देशात प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, शिक्षणाप्रमाणे रोजगार, व्यवसायासाठी आवश्यक संधी मोफत मिळायला हव्यात. याशिवाय फुकटात काहीही मिळत नसले तरी युवक स्वावलंबी होऊन प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक यश स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर साध्य करू शकतात. आजकाल जर शिकून-सवरून शिक्षण आणि पात्रतेनुसार नोकरी किंवा कामधंदा मिळाला नाही तर स्वप्नांचा चुराडा होतो आणि ही स्वप्नं फक्त त्या तरुणांचीच नाही तर त्यांच्याशी निगडित प्रत्येकाची आणि त्या कुटुंबाची स्वप्नंही भंग पावतात. मग एवढय़ा वर्षांच्या शिक्षणावरही प्रश्नचिन्ह उद्भवते की, शिक्षण, मेहनत, पैसा आणि वेळ वाया घालवून आपण चूक केली आहे का? आपण सक्षम तरुण असलो तरी आपले भविष्य अंधःकारमय वाटत असेल तर उच्च शिक्षणाचे महत्त्व काय? देशात दरवर्षी कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन इत्यादी प्रत्येक विषयातील पदव्या घेऊन प्रत्येक राज्यातील लाखो तरुण कामासाठी बाहेर पडतात, पण यापैकी किती तरुण करीअरचे ध्येय गाठतात?
शासकीय पदभरतीत स्पर्धा परीक्षेसाठी बेरोजगार तरुणांकडून मोठी अर्ज फी घेणे हीदेखील समस्या जाणवते. ज्या देशात 80 कोटीपेक्षा जास्त गरीब लोकसंख्येला अन्नधान्य मोफत वाटले जाते, अशा ठिकाणी दरवेळी ही फी गोळा करणे सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांसाठी मोठी अडचण असते. ज्यांना मोठय़ा कष्टाने आपला उदरनिर्वाह चालवावा लागतो अशा आर्थिक अडचणींमुळे अनेक हुशार तरुण स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाहीत. शासनाकडे दरवेळी शेकडो कोटी रुपये जमा होतात. गरीब बेरोजगारांवर लक्ष ठेवून सरकारने या समस्येकडे गांभीर्याने पाहावे.
व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि खोटा देखावा माणसाला उद्ध्वस्त करतो. आजच्या फॅशन आणि सोशल मीडियाच्या व्यसनाने तरुणाईला वेड लावले आहे. आज बहुतेक तरुणांचे आदर्श हे रील लाइफमधील लोक आहेत, जेव्हा की त्यांचे आदर्श देशसेवेसाठी प्राणाची आहुती देणारे सैनिक असले पाहिजेत. देशाला गौरव मिळवून देणारे खेळाडू आणि शास्त्रज्ञ असायला हवेत. ज्या आदर्श समाज सुधारकांनी आणि महान क्रांतिकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, मानवतेचे आणि देशाचे रक्षण केले, त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीनिमित्त आज आपण फक्त काही क्षणांसाठी त्यांचे स्मरण करतो, तर आजच्या युवकांनी महान व्यक्तींच्या जीवनकार्यातून प्रेरणा घ्यायला हवी. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी तरुणांनी स्वतःला काwशल्यपूर्ण आणि निपुण बनविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. आपले वागणे कधीही दुसऱयाच्या दुःखाचे कारण बनू नये हे लक्षात घेऊन पुढे जायला हवे. शासनाने युवाशक्तीला देशाचा आधारस्तंभ मानून त्यांच्याकरिता दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा व रोजगारासाठी उत्कृष्ट उपाययोजना सातत्याने राबवाव्यात. दरवर्षी प्रत्येक क्षेत्रात सातत्याने पदभरती तसेच खेडय़ापाडय़ांत, दुर्गम भागात, सर्वत्र नावीन्यपूर्ण प्रशिक्षण केंद्रांची उपलब्धता ही काळाची गरज आहे. शिफारस, राजकीय हस्तक्षेप, दिरंगाई आणि भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसला पाहिजे, जेणेकरून देशातील तरुण पिढी उज्ज्वल भवितव्याद्वारे देशाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकेल आणि तेव्हाच युवा शक्तीचा योग्य सहभाग राष्ट्रहितासाठी सिद्ध होईल.























































