
विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) गुरुवारी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) नावाचे वादळ घोंगावले. मुंबईच्या या 21 वर्षीय कर्णधाराने पुद्दुचेरीविरुद्ध (Pondicherry) डबल धमाका करत नाबाद 227 धावांची तुफानी खेळी केली. या दरम्यान त्याने 31 चौकार आणि 5 षटकारांचा पाऊस पाडला.
गुरुवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुद्दुचेरी आणि मुंबईचा सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने कर्णधार पृथ्वी शॉ याच्या नाबाद 227 आणि सूर्यकुमार यादव याच्या 133 धावांच्या बळावर 4 बाद 457 धावांचा डोंगर उभारला. विजय हजारे ट्रॉफीतील पृथ्वीची ही सर्वोच्च खेळी ठरली आहे. स्पर्धेत याआधी दिल्लीविरुद्ध त्याने नाबाद 105 आणि महाराष्ट्र विरोधात 34 धावांची खेळी केली होती.
सर्वात वेगवान दुहेरी शतक
लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान दुहेरी शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता पृथ्वी शॉ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पृथ्वी आधी शिखर धवन, कर्ण कौशल आणि विरेंद्र सेहवाग यांच्या नावावर वेगवान दुहेरी शतकाचा विक्रम आहे. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठी खेळी करण्याचा विक्रम पृथ्वीच्या नावावर जमा झाला आहे. पृथ्वीने सेहवाग, ग्रेम पोलाक, रोहित शर्मा यांना मागे सोडले आहे.
‘सूर्य’कुमार तळपला
पृथ्वी व्यतिरिक्त सूर्यकुमार यादव यानेही दमदार खेळी केली. बाद होण्यापूर्वी सूर्यकुमारने 58 चेंडूत 133 धावांची तुफानी खेळी केली. या दरम्यान त्याने 22 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तसेच आदित्य तारे यानेही 56 धावांचे योगदान दिले.
RECORD ALERT
Prithvi Shaw, after scoring 227* vs Pondicherry in the @Paytm #VijayHazareTrophy, now has the highest List A score by a captain in Men’s cricket. #CAPvMUM | @MumbaiCricAssoc
Follow the match https://t.co/udXu4rr12o pic.twitter.com/PVjGu9XBka
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 25, 2021
दरम्यान, पृथ्वी शॉ याला खराब कामगिरीमुळे संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतही त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. आतापर्यंत तो टीम इंडियाकडून 5 कसोटी सामने खेळला असून यात त्याने 1 शतक आणि दोन अर्धशतकांसह 339 धावा केल्या आहेत. तसेच 3 एक दिवसीय लढतीत त्याच्या नावावर 84 धावांची नोंद आहे.




























































