मुंबईकर पृथ्वीचे दमदार पुनरागमन, न्यूझीलंडमध्ये ठोकलं तुफानी शतक

29209

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघात मालिकेतील निर्णायक सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर हिंदुस्थानचा संघ न्यूझीलंडच्या दीर्घ दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया पाच टी-20, तीन एक दिवसीय आणि दोन कसोटी लढती खेळणार आहे. या दौऱ्यातील टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ जाहीर झाला असून आज किंवा उद्या एक दिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर होण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच लढतींच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा झाली. मात्र यात हार्दिक पांड्या आणि पृथ्वी शॉ यांना स्थान देण्यात आले नाही. परंतु एक दिवसीय मालिकेसाठी या दोघांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. रणजी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झालेला पृथ्वी आता सावरला असून न्यूझीलंडमध्ये ‘हिंदुस्थानच्या अ’ संघाकडून खेळत आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर पृथ्वीने आंतरराष्ट्रीय वन डेमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. पृथ्वीने न्यूझीलंडमध्ये वादळी खेळी केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एक दिवसीय लढतीत पृथ्वी शॉ याने 100 चेंडूत 22 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 150 धावांची धावा चोपल्या आहेत. पृथ्वीच्या या खेळीमुळे ‘हिंदुस्थानच्या अ’ संघाने प्रथम फलंदाजी करत 372 धावांचा डोंगर उभारला. पृथ्वीसह अष्टपैलू विजय शंकर याने अर्धशतकी खेळी केली. शंकरने 41 चेंडूत 58 धावा केल्या.

हिंदुस्थानच्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर केटन क्लार्क स्वस्तात बाद झाला. पाठोपाठ जोश क्लार्कसनही माघारी परतल्यामुळे न्यूझीलंड संकटात सापडला. यानंतर जॅक बॉयल आणि फिन अ‍ॅलन यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडचे मधल्या फळीतले फलंदाज झटपट बाद झाल्याने हिंदुस्थानने 12 धावांनी विजय मिळवला.

आपली प्रतिक्रिया द्या