विजय हजारे ट्रॉफी – पृथ्वी शॉचा झंझावात सुरूच! 7 षटकार, 21 चौकारांसह नाबाद 185 धावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युवा फलंदाज पृथ्वी शॉची झंझावाती फलंदाजी मंगळवारीही सुरूच राहिली. त्याने सात गगनभेदी षटकारांसह 21 दमदार चौकारांची बरसात करीत नाबाद 185 धावांची धडाकेबाज खेळी साकारली आणि मुंबईला सौराष्ट्रावर 9 गडी व 49 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईने उपांत्य फेरीत धडक मारली. सौराष्ट्राचे आव्हान येथेच संपुष्टात आले. या लढतीत पृथ्वी शॉची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

विश्वराज जाडेजा (53 धावा), समर्थ व्यास (नाबाद 90 धावा) व चिराग जानी (नाबाद 53 धावा) यांनी दमदार खेळी करीत सौराष्ट्राला 5 बाद 284 धावा उभारून दिल्या.

धोनी, विराटलाही टाकले मागे

पृथ्वी शॉ याने मंगळवारी महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली या दिग्गज फलंदाजांनाही मागे टाकले. त्याने धावांचा पाठलाग करताना ‘लिस्ट ए क्रिकेट’मधील सर्वोत्तम खेळी साकारली.

महेंद्रसिंग धोनीने 2005 साली श्रीलंकेविरुद्ध 299 धावांचा पाठलाग करताना नाबाद 183 धावांची तर विराट कोहलीने 2012 साली पाकिस्तानविरुद्ध 330 धावांचा पाठलाग करताना नाबाद 183 धावांची खेळी केली होती. पृथ्वी शॉने नाबाद 185 धावा करताना दोघांचा रेकॉर्ड मोडीत काढला.

युवा मुंबईकराचे तिसरे शतक

पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफीतील तिसरे शतक अगदी रुबाबात साजरे केले. त्याने सहा लढतींमध्ये खेळताना 196.33 च्या सरासरीने 589 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये तीन शानदार शतकांचा समावेशही आहे. पृथ्वी शॉची नाबाद 227 धावांची खेळी सर्वोत्तम ठरलीय. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 14 षटकार व 78 चौकार चोपून काढले आहेत.

123 चेंडूंत वादळी खेळी

सौराष्ट्राकडून मिळालेल्या 285 धावांचा पाठलाग करणाऱया मुंबईने अवघ्या 41.5 षटकांत आणि एक गडी गमावत बाजी मारली. पृथ्वी शॉने फक्त 123 चेंडूंचा सामना करताना नाबाद 185 धावांची खेळी साकारली. त्याने यशस्वी जैसवालच्या (75 धावा) साथीने पहिल्या विकेटसाठी 238 धावांची सणसणीत भागीदारी रचली. यशस्वी जैसवालने एक षटकार व 10 चौकारांनी आपली खेळी सजविली. यशस्वी जैसवाल बाद झाल्यानंतर पृथ्वी शॉने आदित्य तरेच्या (20 धावा) साथीने मुंबईला विजय मिळवून दिला.

विजय हजारे ट्रॉफीच्या अन्य उपांत्यपूर्व लढतीत उत्तर प्रदेशने दिल्लीवर 46 धावांनी विजय मिळवत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. दिल्लीचा या स्पर्धेतील खेळ मात्र खल्लास झाला. करण शर्मा (83 धावा), उपेंद्र यादव (112 धावा) व समीर चौधरी (नाबाद 43 धावा) यांची जबरदस्त फलंदाजी व यश दयालसह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर उत्तर प्रदेशने विजय संपादन केला हे विशेष. आता 11 मार्चला होणाऱया उपांत्य लढतीत मुंबई आणि कर्नाटक तसेच गुजरात व उत्तर प्रदेश आमनेसामने येतील.