
मुंबईतील 2014 ते 2019 या काळात खासगी रक्तपेढ्यांनी सुमारे 15 कोटींच्या अतिरिक्त प्रोसेसिंग फी आकारली असल्याचं वृत्त आहे. माहिती अधिकारांतर्गत हा खुलासा राज्याच्या रक्त संक्रामण परिषदेने केला आहे.
अन्न आणि औषध प्रशासन तसंच राज्य रक्त संक्रामण परिषदेने संयुक्तरित्या या बाबत सात वर्षांपूर्वी तपासणीला सुरुवात केली होती. त्यांच्या तपासणीत असं आढळलं की, प्रत्येक शहरातील दर तीन रक्तपेढ्यांमागे एक अशा सरासरीने एक रक्तपेढी अशा प्रकारे अतिरिक्त प्रक्रिया शुल्क आकारून नियमांचं उल्लंघन करते. देशात रक्त खरेदी किंवा विक्री शक्य नसली तरी रक्तपेढ्या या रक्त संकलन, तपासणी, पुरवठा तसंच, रक्त आणि रक्ताशी संबंधित इतर घटकांच्या साठवणुकीसाठी प्रकिया शुल्क आकारतात. पण, अनेक रक्तपेढ्या या जवळपास 100 टक्के ते 500 टक्के इतकी वाढ करत प्रक्रिया शुल्क आकारत आहेत, असं उघड झालं आहे.
ही बाब उघड झाल्यानंतर आता रक्त संक्रामण परिषदेने आता यावर कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आता अशा प्रकारे अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढ्यांवर 20 टक्के दंड आकारण्यात येणार आहे.