
कोरोना उपचारांसाठी वाढीव बिल घेतल्याबाबत 26 रुग्णालयांविरोधात आलेल्या 134 तक्रारींचा निपटारा पालिकेने केला असून एकूण 23 लाख 42 हजारांचे बिल कमी केले आहे. यामध्ये खासगी रुग्णालयांनी आकारलेल्या एकूण रकमेच्या 15 टक्के रक्कम कमी करण्यात आली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार मिळावेत म्हणून खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा पालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. या खाटांच्या वितरणासाठी पालिकेच्या माध्यमातून समन्वय ठेवला जात आहे. या खासगी रुग्णालयांनी 21 मे रोजी राज्य सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे शुल्क आकारावे असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र काही खासगी रुग्णालयांकडून शासनाचे नियम डावलून अवाजवी बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर या खासगी रुग्णालयांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच सनदी अधिकार्यांची टीम नियुक्त केली असून तक्रारींसाठी मेल आयडीही जाहीर केला आहे. शिवाय प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी पालिकेच्या मुख्य लेखा परीक्षक विभागातील प्रत्येकी दोन अधिकार्यांची नियुक्ती केली आहे.
एका आठवड्यात तक्रारी निकाली
मुंबईतील तक्रारी आलेल्या 26 खासगी रुग्णालयांतील 134 तक्रारींमध्ये मूळ आकारणी 1 कोटी 61 लाख 88 हजार 819 रुपये होती. या देयकांचे पालिकेने लेखा परीक्षण केल्यानंतर प्रत्यक्षात ही रक्कम 1 कोटी 38 लाख 46 हजार 705 रुपयांपर्यंत कमी झाली. विशेष म्हणजे एका आठवड्यात या तक्रारी निकाली काढण्यात आल्या. या तक्रारींपैकी 40 टक्के तक्रारी या शासनाने खासगी रुग्णालयांची दरनिश्चिती करण्याआधीच्या आहेत.

























































