खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांना बेस्टची सवलत पास योजना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांना बेस्ट सवलतीचा पास देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या लोकार्पण सोहळ्यात केली. ते पुढे म्हणाले की, पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 200 रुपयांचा, दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 250 रुपयांचा तर बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 350 रुपयांचा सवलत पास देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

बेस्ट, रेल्वे, मेट्रो, मोनो आदी सर्व सेवांसाठी एकाच कार्डावर तिकीट काढण्याची सोय असलेल्या देशातील पहिल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पालिकेच्या शाळेतील मुलांसाठी ‘हात दाखवा आणि बस थांबवा’ ही योजना सध्या सुरू असून या मुलांना शाळेपर्यंत मोफत सोडले जाते. आता खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांना सवलतीत पास दिले जातील.

‘पुढे चलो’ अॅपवर आपण बेस्ट आणि मेट्रोचे सर्व रूट आणले आहेत. आता रेल्वेशी बोलणी चालू आहेत. त्यामुळे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डवर सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणे शक्य होणार असून त्यामुळे मुंबईकरांची सुट्टय़ा पैशांच्या कटकटीतून सुटका होणार असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

ओला, उबरप्रमाणे बेस्टची प्रीमियम बस सेवा

बेस्ट उपक्रमाने ओला, उबर या मोबाईल अॅप आधारित खासगी टॅक्सी सेवांप्रमाणे प्रीमियम बस सेवा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. येत्या चार ते सहा महिन्यांत ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.

कामगारांची 483 कोटी ग्रॅच्युईटी खात्यावर जमा

या सोहळ्यात बेस्ट कर्मचाऱयांच्या ग्रॅच्युईटीचा 483 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून कर्मचाऱयांच्या खात्यात वळविण्यात आला. बेस्टच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’चेही या वेळी प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी महापौर किशोरी पेडणेकर, बेस्टचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर, महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, परिवहनमंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.