बदनामीप्रकरणी प्रियंका चतुर्वेदी यांची भाजप नेत्यांना नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभेतून अधिवेशनकाळापुरत्या निलंबित केलेल्या शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी बदनामी व विपर्यस्त माहिती प्रसारित केल्याप्रकरणी भाजप नेते आशीष शेलार, अतुल भातखळकर व भारत बलवल्ली यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी सभागृहाची माफी मागावी त्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, असे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी सुचविले होते, मात्र माफीसंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नसतानाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घुसडवून भाजपच्या काही नेत्यांनी प्रियंका चतुर्वेदींच्या नावे बातम्या प्रसारित केल्या होत्या. संबंधित नेत्यांनी तातडीने बिनशर्त माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असे या नोटिसीत नमूद केले आहे. भाजप नेत्यांची कृती ही माझी व शिवसेनेची बदनामी करणारी असल्याचेही यात म्हटले आहे.