
कनाडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरात खालिस्तानी समर्थकांनी गुरु नानक सिख गुरुद्वारा परिसरात बोगस खालिस्तान दूतावास उभारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खालिस्तानी गट सिख्स फॉर जस्टिसने (SFJ) हा कथित दूतावास उभारला असून, त्यावर ‘रिपब्लिक ऑफ खालिस्तान’ असे बोर्ड लावण्यात आले आहे. या इमारतीवर खालिस्तान आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या हरदीप सिंह निज्जर याचे पोस्टरही लावण्यात आले आहेत. निज्जर याची 18 जून 2023 रोजी सरे येथील गुरुद्वारा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
स्थानिकांच्या माहितीनुसार, हा बोगस दूतावास असलेली इमारत ब्रिटिश कोलंबिया सरकारच्या निधीतून बांधण्यात आली आहे. याच इमारतीत नुकतेच 1.5 लाख डॉलर्स खर्चून लिफ्ट बसवण्यात आली आहे. हा दूतावास गुरुद्वारा परिसरातील एका इमारतीत उभारण्यात आला असून, ही इमारत सामुदायिक केंद्र म्हणूनही वापरली जाते.
कनाडाच्या गुप्तचर संस्थेने (CSIS) जून 2025 मध्ये आपल्या अहवालात प्रथमच उघडपणे नमूद केले की, खालिस्तानी दहशतवादी कनाडाच्या भूमीचा वापर हिंदुस्थानविरोधात हिंसक कारवाया, निधी संकलन आणि प्रचारासाठी करत आहेत. या अहवालाने हिंदुस्थान आणि कनाडा यांच्यातील राजनैतिक तणाव पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. हिंदुस्थानने गेल्या अनेक वर्षांपासून कनाडातील खालिस्तानी दहशतवाद्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. 1980 च्या दशकापासून कनाडात खालिस्तानी दहशतवादी हिंदुस्थातील पंजाबमध्ये स्वतंत्र खालिस्तान राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंसक मार्गांचा अवलंब करत आहेत.