सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बुधवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आमदारांचा शपथविधी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार बाळासाहेब थोरात यांच्यानंतरचे ज्येष्ठ आमदार असलेल्या कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून ते आमदारांना शपथ देणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने सरकारच गडगडले. यामुळे बहुमत सिद्ध करण्याचा विषय निकाली निघाला आहे. पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.
राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी समारंभाला मुख्य सचिव अजोय मेहता, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर. एन लढ्ढा, विधान मंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी घेण्यात येणार आहे. यासंबंधीची अधिसूचना, आवाहनपत्र विधानसभेच्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधान भवन, मुंबई येथे सकाळी 8.00 वाजता सुरू होणार असल्याचे राज्यपालांकडून कळविण्यात आले आहे.

























































