राजस्थानचे ‘राजे’ कोण; गहलोत-पायलट यांचे नाव आघाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानमध्ये काँग्रेसने भाजपला मात देत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये 2008 सारखी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट आणि अशोक गहलोत मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. या दोघानांही दुखावणे काँग्रेसला महागात पडणार असल्याने तिसऱ्याच उमेदवाराला मुख्यमंत्रीपदी बसवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

2008 मध्ये अशोक गहलोत आणि तत्कालीन प्रदेश अध्यक्ष सी. पी. जोशी मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. सी.पी. जोशी एका मताने पराभूत झाले होते. तरीही ते मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. अखेर आमदारांच्या पसंतीनुसार गहलोत यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. आता 10 वर्षांनंतर राजस्थानमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता गहलोत आणि पायलट हे मुख्यमंत्रीपदसाठी प्रबळ दावेदार आहेत. पायलट चार वर्षांपेक्षा जास्त काळ प्रदेशाध्यक्ष आहेत. तर गहलोत यांचे पक्षावर वर्चस्व आहे. दोन्ही नेत्यांचे समर्थक आपलाच नेता मुख्यमंत्रीपदी असावा यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या दोघांच्या संघर्षात तिसऱ्याच नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आता पुन्हा सी.पी. जोशी यांचे नावही चर्चेत आले आहे.