
अटकेतील आरोपीला जामीन मिळण्यासह न्यायालयात म्हणणे लवकर मांडण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणाऱया परिविक्षाधीन महिला पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस अंमलदाराला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे.
परिविक्षाधीन महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती मच्छिंद्र डोके (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) व पोलीस अंमलदार संदीप रावसाहेब खेंगट (रा. बाबुर्डी बेंद, ता. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अंमलदार खेंगट याला तक्रारदाराकडून 8 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असून, परिविक्षाधीन महिला उपनिरीक्षक डोके व खेंगट यांनी लाच मागितल्याचे समोर आल्याने त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या मुलावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुह्याचा तपास महिला उपनिरीक्षक डोके या करीत आहेत. तक्रारदार यांच्या मुलाला दाखल गुह्यात अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला लवकर जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी व न्यायालयाने म्हणणे मागितल्यावर लवकर देण्यासाठी उपनिरीक्षक डोके व अंमलदार खेंगट यांनी 8 हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गुरुवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात खेंगट याला रंगेहाथ पकडले. खेंगट याने उपनिरीक्षक डोके यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याचे सांगितल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
































































