चंद्रपुरात खासगी कोचिंग क्लासवाल्यांचा उच्छाद, सततच्या फोनमुळे पालक कंटाळले

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. परंतू हे दूध आपल्या पाल्यांना पाजणे हे पालकांसाठी भरमसाठ फी व कोचिंग क्लासेसच्या वाढत्या व्यवसायमुळे डोकेदुखी होऊन बसले आहे. गेल्या काही वर्षांत संपूर्ण राज्यात कोचिंग क्लासचे प्रमाण वाढले असून चंद्रपूरही त्याला अपवाद नाही. या कोचिंग क्लासने संभाव्य ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी पालकांचे नंबर हुडकून काढले असून , या क्लासच्या येणाऱ्या फोनमुळे हे पालक वैतागले आहेत.

पालकांचे मोबाईल नंबर मिळतात तरी कसे ?

आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे हा विचार करून पालक आपल्या मुलांना सीबीएसईच्या शाळेत घालतात किंवा कॉन्व्हेंटचा शाळांमध्ये घालतात. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश पालकांना कोचिंग क्लासमध्ये पाल्याचा दाखला घेण्यासाठी फोन येत आहेत. हे नंबर क्लासवाल्यांना कसे मिळतात असा प्रश्न निर्माण झाला आहे. क्लासवाले आणि शाळांमधील कर्मचारी यांच्या संगमनतातून या क्लासवाल्यांना फोन नंबर मिळत असावेत असा काही पालकांचा अंदाज आहे.

आयआयटी,जेईई,एनइईटी च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना आम्हीच अव्वल आणू शकतो असा दावा करीत अनेकांनी शिक्षणाचे व्यापारीकरण केले आहे. हा व्यापार जोमात चालावा म्हणून वर्ग 8 पासूनच क्रॅश कोर्सेसच्या नावाखाली विद्यार्थ्यांना हेरले जाते. यासाठी काही शाळांनी तर आपल्याच कॅम्पस मध्ये दुकान थाटले आहे. तर काही कोचिंग क्लासेसने कॉलेज सुरू केली आहेत. अश्या विद्यार्थ्यांना नंतर कॉलेजला पण जाण्याची गरज नाही असं क्लासवाल्यांकडून बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.