
प्रा. अनिल कवठेकर
वास्तव जगण्यातलं प्रेम आणि चित्रपटातलं प्रेम यामध्ये बरंच अंतर असतं. व्यवहारी जगात जर कोणी प्रेमात पडला तर तो काही गाणी लिहीत नाही तसंच ती गाणी गात बागेमध्ये प्रेयसीसोबत फिरतही नाही. चित्रपटात मात्र त्या दोघांना आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी बागेत, डोंगररांगांमध्ये, समुद्रकिनाऱ्यावर, नदीकिनाऱ्यावर आणखी कुठे कुठे भटकावं लागतं आणि या सगळ्या गाण्यांमध्ये आपली प्रेयसी कशी दिसते हे कोणाला तरी सांगण्याचा मोह त्याला आवरत नाही. तिचं सुंदर दिसणं हे चंद्रासारखं सुंदर असल्याचं अनेक गीतकारांनी त्यांच्या गाण्यांमधून मांडलेलं आहे.
वो चाँद खिला वो तारे हंसे
ये रात अजब मतवाली है …
एखाद्या कळीने उमलावं तसा आज चंद्र उमललेला आहे. त्याच्या उमलण्याने रात्रीला एक वेगळाच गंध आलेला आहे आणि हे सगळं फक्त आम्हाला माहीत आहे. ज्यांना ते कळलं नाही ते याबाबतीत अडाणी आहेत. अशी गाणी प्रेमात पडल्यानंतर सुचतात आणि प्रेमात पडल्यानंतरच वाटतं की चंद्र आता कळीसारखा उमललेला आहे. तर एखाद्याला आपल्या प्रेयसीचा चेहरा इतका सुंदर वाटतो की, चंद्राने जरी तिला पाहिलं तरी त्या चंद्रालासुद्धा खूप वाईट वाटेल.
चांद आहे भरेगा फूल दिल थाम लेंगे
हुस्न की बात चली तो सब तेरा नाम लेंगे…
ज्या गाण्याशिवाय अंताक्षरी पूर्ण होत नाही आणि ते गाणं चुकीच्या सुरात म्हणताना सगळ्यांना जो उत्साह येतो ते गाणं म्हणजे,
खोया खोया चांद
खुला आसमान आँखो मे
सारी रात जायेगी
तुमको फिर कैसे नींद आयेगी
हे गाणं पाहताना देव आनंद सगळ्या वनश्रीतून धावताना आपल्याला दिसतो. हे गाणं ऐकताना देव आनंद दिसणं, त्याचं धावणं, त्याचं ते रोमँटिक हसणं हेसुद्धा दिसायला लागतं. त्याबरोबर त्या शब्दांचा विचार करताना जाणवतं की, असं चंद्राने नेमकं काय पाहिलं की, तोसुद्धा सारं काही विसरून भान हरपून गेला आहे. कारण तो नायिकेचं सौंदर्य पाहून अवाक् झालेला आहे.
हे असं सगळय़ांच्या बाबतीत अनेक वेळा घडतं. त्याचं तिच्यावर प्रेम असतं, पण त्याला ते व्यक्त करण्याची हिंमत होत नाही. अशा वेळेला तोही तिच्या सौंदर्याची तारीफ करण्यासाठी चंद्रालाच जवळ करतो आणि गातो,
चांद को क्या मालूम चाहता है
उसे कोई चकोर
वो बेचारा दूर से देखे करे ना कोई शोर… या गाण्यांमध्ये अनेकदा मंदिर हा शब्द येतो, पण चर्च हा शब्द सहसा नसतो. ‘देवता’मध्ये नायक ख्रिश्चन आहे आणि तो आपल्या प्रेयसीला चर्चच्या मागच्या बाजूला भेटायला बोलावतो चर्चच्या पुढच्या बाजूला खूप गर्दी असते. पण मागच्या बाजूला कोणी जात नाही. ते गाणं असं…
चांद चुराके लाया हुं चांद चुराके लाया हुं
चल बैठे चर्च के पीछे,
ना कोई देखे ना पहचाने
बैठे पेड के नीचे, चल बैठे चर्च के पीछे… पूर्वीच्या अनेक गाण्यांमध्ये एक शालीनता होती. प्रेमिकांना भेटताना कोणी पाहू नये याची खबरदारी त्या काळात घेतली जात होती. किसीने देखा तो नही तुम्हे आते
नही मैं आई हुं छुपते छुपाते…
समाजाची भीती आणि संस्कार या दोन्हीचा संगम या गाण्यामध्ये आहे.
सनी देओलचा पहिला चित्रपट ‘बेताब’ची गाणी त्या काळात खूप गाजली होती. यातल्या एका गाण्यात नायिका नायकासोबत लपाछपी खेळते. ती कशी खेळते ते सांगताना नायक गातो,
चांद के जैसे छिपती और निकलती थी…
आकाशातला चंद्र जसा वारंवार ढगात लपतो आणि पुन्हा ढगातून बाहेर येतो तशी ती त्याला जाणवते. त्या प्रत्येक क्षणी दिसणारं चंद्राचं सौंदर्य त्याला अधिकच भावतं. खरं तर हा एक भास असतो, कारण चंद्र त्याच ठिकाणी असतो. ढग वाऱ्याने वाहत असतात. पण गाण्यांमध्ये, विज्ञान, गणित, भूगोल आणायचं नसतं. नाहीतर गाण्यातलं सौंदर्य समजणार नाही.
निळ्या आकाशात चंद्राचं उगवणं आणि त्या चंद्रप्रकाशात प्रेमाचा वर्षाव करणं, याचा मनाला कुठेतरी त्रास होतोय; कारण असा प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी कोणीतरी हवं आणि ते अजून मला भेटलेलं नाही. माझ्या मनाला लागलेली प्रेमाची तहान कुणीतरी शांत करायला हवी.
निले निले अंबर पे चाँद जब आये
हमको तरसाये प्यार बरसाये…
किशोर कुमार यांनी गायलेलं अतिशय सुंदर गीत तितकंच अप्रतिम कल्याणजी आनंदजी यांचं संगीत. कुणाल गोस्वामी आणि सोबतीला श्रीदेवीसारखी अप्सरा असूनही चित्रपट हिट झाला नाही. असतं एकेकाचं नशीब असं.
‘अब्दुल्ला’मध्ये नायक मोठी कमालच करतो. तो चंद्रालाच आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याबाबत विचारतो…
मैने पूछा चांद से के देखा है कही
मेरे यार सा हंसी
चांदने कहा चांदनी की कसम
नही नही नही…
इथे त्याने चंद्राला विचारून खात्रीच करून टाकली की, माझ्या प्रेयसीइतकी सुंदर जगात कोणी आहे का तर नाही. नाही बाबा, तिच्याइतकं सुंदर कोणीच नाही. याला एक सुंदर काव्य म्हणतात. डायरेक्ट चंद्राशी संवाद करणं ही साधी गोष्ट नाही. याच पद्धतीने चेतनगुणोक्ती अलंकाराचं उदाहरण होऊ शकेल अशी काही गाणी येतात. त्यापैकी एक,
चंदा ओ चंदा किसने चुराई
तेरी मेरी निंदिया …
आपलं दुःख आणि चंद्राचं दुःख एकाच पातळीवर आणून त्या दुःखाला वैश्विक करण्याचा प्रयत्न नायिका करते. ती म्हणते, मी तर जागी आहे, माझ्या दुःखाने. पण चंद्रा तुला कोणतं दुःख आहे. तू का असा रात्रभर जागा असतोस.
रुक जा रात ठहर जा रे चंदा
बीते ना मिलन की बेला
आज चांदनी की नगरी मे अरमानों का मेला
रात्र आणि चंद्र यांना व्यक्ती समजून ती त्याला आर्ततेने साद घालते आहे. थांब आज या चांदण्यांच्या नगरीमध्ये माझ्या इच्छांची जत्रा भरलेली आहे. किती सुंदर उपमा आहे ही! चांदण्यांचं नगर आणि इच्छांची जत्रा. लतादीदींच्या आवाजाने त्या गाण्याला आलेली मधुरता अवर्णनीय आहे.
सैंया दिल मे आना रे आ के
फिर ना जाना रे
चांदनी रात होगी तारों की बारात होगी
पहले पहले प्यार की पहिली पहिली बात होगी
खरं तर हे गाणं खूप सुंदर आहे. नीट ऐकलं तर लक्षात येतं की, ती त्याला प्रत्यक्षात बोलवतच नाहीये. ती त्याला तिच्या हृदयात बोलावते आणि सांगते की, एकदा आलास की इथून जायचं नाही; येण्याची वेळसुद्धा रात्रीची आहे. आकाशात टिपूर चांदणं पडलेलं आहे. जणू काही चांदण्याची वरात निघालेली आहे. अशा चांदण्या रात्री तू ये, मग आपण प्रेमाच्या गोष्टी मनातल्या मनात करू, कारण तो प्रत्यक्षात येणारच नाहीये.
नायिका जर एखाद्या कबिलेवाल्याची मुलगी असेल तर तिच्या गाण्यांमध्ये येणारे ग्रामीण शब्द गाण्याचं सौंदर्य वाढवतात. नायकाला तू जाऊ नकोस असं सांगताना त्याला चंद्र म्हणून ती संबोधते आणि विनंती करते,
आज तो जुनली रात मा
धरती पर है आसमां
कोई रे बनके चांदनी उतरा मन के आंगना
चंदा रे तू जान जा…
आजची रात्र खूप सुंदर, हसरी आहे आणि खूप महत्त्वाचीसुद्धा आहे. धरणीवर पसरलेलं आकाश आणि त्या आकाशातल्या चांदण्या या क्षणी माझ्या मनाच्या अंगणात उतरलेल्या आहेत. तू असा कसा रे, हे चंद्रा, हे चांदणे येथे असताना तू जाऊ नकोस.
चंद्रासोबत केवळ आनंद आणि आनंदच वाटला जातो असं नाही तर काही वेळा चंद्रासोबत दुःखही वाटलं जातं.
चांद फिर निकला मगर तुम ना आये
जला फिर मेरा दिल करू क्या मैं हाये…
चंद्र तर नेहमीसारखा आकाशात उगवलेला आहे. पण तुझं येणं काही होत नाही आणि म्हणून तुझ्या न येण्याने या चांदण्याच्या प्रकाशातसुद्धा माझं अंतकरण जळत आहे. काय करू तूच मला सांग.
चंद्र आणि चांदण्यांचं वर्णन करताना कृष्णाचं आगमन होणार नाही असं शक्य आहे का?
आज राधा को श्याम याद आ गया
दिल को कोई काम याद आ गया
लतादीदींच्या स्वरातलं असं गाणं ऐकल्यावर यमुनाकाठ आणि तिथे गाणारी राधा दिसू नये असं शक्य आहे का? चित्रपटाचं नावसुद्धा ‘चांद का टुकडा’ असंच होतं.
अतिशयोक्ती, अलंकार केवळ विनोदासाठीच असतो असं नाही तर कधीकधी आपल्या भावभावनांना स्पष्ट करण्यासाठी तो गाण्यांमधूनसुद्धा येतो. तुझ्यासाठी मी आकाशातला चंद्र, तारे तोडून आणू शकतो असं काही सांगणारं हे गीत. खरं तर जगण्यात असाच आत्मविश्वास असावा.
जो भी चाहू वो मै पावू
जिंदगी मे जीत जाऊ
चांद तारे तोड लाऊ सारी
दुनिया पर मै छाऊ
बस इतना सा ख्वाब है
आकाशात चंद्र उगवला आहे. तेव्हा प्रिये तू तुझ्या चेहऱ्यावरती ओढणी घे. जर चंद्राने तुला पाहिलं तर तो तुझं सौंदर्य चोरून घेईल की काय, अशी मला शंका वाटते.
चांद से पर्दा कीजिए कही
चुरा ना ले चेहरे का नूर
ओ मेरे हम नवाज ए मेरे हुजूर
नायकाला नयिका चंद्रासमान भासत असल्याचं अनेक गाण्यांत आलं आहे.
मेरा चांद मुझे आया है नजर
ए रात जरा थम थम के गुजर
खरं तर यात चंद्राचा आणि रात्रीचा काही संबंध नाही, पण तो संबंध गीतामध्ये येऊ शकतो, त्या गीताचं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि म्हणूनच नायक म्हणतो, मला माझा चंद्र गवसलेला आहे. तो चंद्र अधिक काळ माझ्यासोबत माझ्याजवळ राहावा म्हणून तो रात्रीला विनंती करतो की, तू थोडं हळूहळू प्रवास कर.
प्रेम करणाऱ्यांच्या भावना दाखवण्यासाठी, त्यांचं हृदय मोकळं करण्यासाठी, त्यांच्या मनातील त्यांच्या भावविश्वाला सुंदर शब्दात मांडण्यासाठी, अनेक गीतकारांनी चंद्र आणि चांदण्यांना जोडीला घेत शब्दशारदेचं चांदणं फुलवलं. रोमान्स आणि काव्याची सांगड घालून अनेक अजरामर गाणी दिली. कारण चंद्र आणि चांदण्या म्हणजे प्रेम… उद्याचा आशावाद…
ती सुंदर म्हणजे नक्की कोणासारखी तर ती चंद्रासारखी… हे अनेक गीतकारांनी आपल्या गाण्यांमधून मांडलेलं आहे आणि हे मांडताना त्या गीतकारांनी तो चंद्र ते चांदणं इतक्या विविध शैलीत आणि सौंदर्याच्या वेगवेगळ्या मापदंडांना सादर करत आणलेलं आहे की, बऱ्याचदा काही गाण्यांतल्या शब्दांमध्ये साम्य असूनही त्याच्या श्रवणीय चालीमुळे ते गाणं आणि त्यातील शब्द आपल्याला सुंदरच वाटतात.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)





























































