
ड्रग्जची विक्री करणाऱया दुबईतील प्रोफेसरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली. दिबा ओलीवर मक्की असे त्याचे नाव असून त्याच्याकडून काही प्रमाणात ड्रग्ज एनसीबीने जप्त केले आहे.
मंगळवारी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने मुंबई आणि नालासोपारा येथे कारवाई केली. पश्चिम उपनगरात एनसीबीने कारवाई करून दिबाला ताब्यात घेतले. दिबा हा परदेशी नागरिक असून तो दुबई येथील एका महाविद्यालयात बायोलॉजी हा विषय शिकवत असायचा. त्याला हेपेटायटीस आजाराची लागण झाल्याने तो उपचारासाठी हिंदुस्थानात आला होता. हिंदुस्थानात आल्यावर त्याला एका नायजेरियनने ड्रग्ज विक्रीसाठी दिले होते. त्यानंतर दिबा हा ड्रग्जची तस्करी करू लागला होता. त्याच्याकडून एनसीबीने काही प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे. तर दुसरी कारवाई आग्रीपाडा परिसरात करून इम्रान ऊर्फ लॅबीला एनसीबीने अटक केली. त्याच्याकडून एनसीबीने ड्रग्ज आणि 9 लाख 25 हजार रुपये जप्त केले. ड्रग्ज तस्करी प्रकरणी इम्रानविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
दुबईला पाठवायचा गांजा
एनसीबीने सबीर अली शौकत अली या तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत. तो मीरा-भाईंदर येथील एका कुरीअरच्या कार्यालयातून गांजाचे पार्सल दुबई येथील अब्दुल हमीदला पाठवत होता. 10 किलो चरसच्या तस्करी प्रकरणी सबीर अलीला दिल्ली एनसीबीने अटक केली होती. जामिनावर बाहेर आल्यावर तो नालासोपारा येथे आला. गांजा तस्करी प्रकरणी सबीरला एनसीबीने अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.































































