मरणाला चकवून सकारात्मक ऊर्जा देणारा ‘पा’… श्रेयश बारमाते

130

>> प्रवीण दाभोळकर

प्रोजेरिया आजाराने ग्रस्त आणि अमिताभ बच्चन यांच्या भेटीची चर्चा सोशल नेटवर्किंग साईटवर रंगली. बच्चनजींच्या सिनेमातील ऑरोप्रमाणेच श्रेयश हा अगदी निरागस, निखळ हसणारा. आपल्या आजाराला कवटाळून न बसता वेगवेगळ्या कला आत्मसात करणाऱ्या श्रेयशकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे. नैराश्यात असलेल्यांसाठी तो आशेचा किरण बनला आहे. प्रोजेरिया आजाराचं गांभीर्य जाणवूही न देता सहजपणे लढण्याची त्याची वृत्ती आपल्याला नक्कीच चकित करते.

फेसबुक, यूटय़ूबसारख्या सोशल मीडियात सध्या प्रोजेरियाग्रस्त श्रेयश बारमाते आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या भेटीची चर्चा आहे. प्रोजेरिया या आजारात मुलांचे वय सरासरी 14 वर्षांचे असते. श्रेयश सध्या 13 वर्षांचा आहे. बिग बींच्या ‘पा’ सिनेमातील ऑरो हे पात्र प्रोजेरियाबद्दल भाष्य करते. अमिताभ बच्चन यांनी साकारलेले ते पात्र श्रेयशला चांगलेच भावले. म्हणून बिग बींना प्रत्यक्षात भेटावे अशी इच्छा तो गेली अनेक वर्षे व्यक्त करत होता. सिनेमातील ऑरोप्रमाणेच श्रेयश हा अगदी निरागस, निखळ हसणारा, सुरुवातीला अबोल, पण नंतर मस्तीखोर, अतिशय हुशार असा मुलगा आहे. आपल्या आजाराला कवटाळून न बसता वेगवेगळय़ा कला तो आत्मसात करतोय. त्यामुळे समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नैराश्येत असलेल्यांसाठी तो आशेचा किरण बनला आहे.

अरविंद आणि मनीषा बारमाते हे दाम्पत्य मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे राहतात. अरविंद हे तिथल्या उच्च न्यायालयात क्लर्क पदावर काम करतात. 8 जुलै 2006 ला नागपूरच्या मिडास रुग्णालयात या दाम्पत्याने जुळय़ा मुलांना जन्म दिला. श्रेयश त्यातील एक. नागपूर हे त्याच्या मामाचे गाव. मामाकडे नियमित येणे-जाणे होत असल्याने तो मराठी भाषा खूप छान बोलतो. वयाच्या साधारण तीन महिन्यांतच त्याचे केस झडण्यास सुरुवात झाली आणि हे कोणत्या तरी आजाराचे लक्षण असल्याचे बारमाते दाम्पत्याच्या लक्षात आले. प्रोजेरिया आजाराबद्दल त्या वेळी जनजागृती नव्हती. त्यामुळे बारमाते कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्काच होता, पण हेच बाळ पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात सोनेरी क्षण आणेल हे त्यांना सांगूनही खरे वाटले नसते.
इतर मुलांच्या तुलनेत श्रेयशचे वय झपाटय़ाने वाढू लागले. त्याची उंची खुंटली, त्वचा शुष्क होऊ लागली. अंगावरील केस गळू लागले. हळूहळू टक्कल पडू लागले. त्यामुळे सोबतच्या मुलांपेक्षा तो वेगळा दिसू लागला. असे असले तरी तो प्रचंड उत्साही असे. शाळेची त्याला आवड होती. घरापासून किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बालक मंदिर शाळेत पहिलीसाठी त्याने प्रवेश घेतला. शाळेचे कपडे, बॅग, डबा हातात घेऊन मम्मीच्या कडेवरून तो शाळेत पोहोचला. पहिल्या दिवशी मम्मी वर्गाबाहेर बसून राहिली. त्याचा जुळा भाऊ घरी जाण्यास रडत होता, पण श्रेयशला तसे रडूसे वाटत नव्हते. तो आजूबाजूचे निरीक्षण करत होता. पहिला दिवस चांगला गेला. दुसऱया दिवशी एका मस्तीखोर विद्यार्थ्याने श्रेयशच्या डोक्यावरची टोपी उडवली आणि सारे जण हसायला लागले. चिमुरडय़ा श्रेयशच्या आत्मविश्वासाला तडा गेला आणि तो रडला. त्या मुलाची तक्रार त्याने मॅडमकडे केली. त्याला शिक्षाही झाली.
श्रेयशच्या दिसण्यावरून त्याला आयुष्यभर टोमणे सहन करावे लागणार हे बारमाते दाम्पत्याच्या लक्षात येत होते. त्यामुळे श्रेयशने असे काही तरी करावे ज्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्या आजारावरून दूर जाईल असे त्यांना वाटते होते. श्रेयशचा आवाज बारीक चणीचा आहे. पाच वर्षांचा असताना ‘तुला गाणं शिकायला आवडेल का?’ असं त्याच्या आईने विचारले. उत्साहात त्याने ‘हो’ असे म्हटले. तेव्हापासून गेली 8 वर्षे तो शास्त्रीय संगीत शिकतोय. आघाडीचे अनेक रिऍलिटी शोमध्ये त्याने सहभाग घेतलाय.

संगीतातील ज्ञानामुळे श्रेयशच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. सोबत स्वीमिंग, डान्सिंग करण्याचीही त्याला आवड निर्माण झाली. त्याला हवी असलेली प्रत्येक वस्तू आणून देण्याचा अरविंद बारमाते यांचा प्रयत्न असतो. 24 मार्च 2017 मध्ये मध्य प्रदेश सरकारने बाल संरक्षण आयोगाचा एक दिवसाचा अध्यक्ष बनवले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह हे श्रेयशला भेटायला आले. त्यांनी त्याला लॅपटॉप गिफ्ट दिला. त्यानंतर बाल संरक्षण आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष राघवेंद्र शर्मा यांनीदेखील श्रेयशची भेट घेत त्याला हार्मोनियम गिफ्ट केला. आता श्रेयश सेलिब्रिटी झाला होता. भेटणारा प्रत्येक व्यक्ती श्रेयशच्या गाण्याचे कौतुक करू लागला. त्याला त्याची कला आणि आवडीनिवडींविषयी विचारू लागला. बारमाते दाम्पत्याला हेच अपेक्षित होते.

सध्या तो शाळा आणि संगीतात पुढचे शिक्षण घेतोय. अनेक कार्यक्रमांमध्ये गायला जातो. टीव्ही रिऍलिटी शोमध्ये सहभागी होतो. ‘इंडियाज गॉट टॅलेंट – सीझन 1’ मध्ये श्रेयशचे गाणे ऐकून करण जोहर, मलायका यांनादेखील अश्रू अनावर झाले होते. आता समोरून येणारी माणसे मला चिडवत नाहीत तर ‘तुला टीव्हीवर बघितलंय…तू खूप छान गातोस, असं म्हणत माझ्यासोबत सेल्फी घेतात तेव्हा खूप छान वाटतं’ असे श्रेयश सांगतो.

26 डिसेंबरला श्रेयशला हृदयाचा त्रास जाणवू लागला होता. त्याचा श्वास मधेमधे थांबत होता. ईसीजी, ईकोचे रिपोर्ट पाहिल्यानंतर त्याचे हृदय केवळ 20 टक्केच काम करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढचे सात दिवस म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत तो व्हेंटीलेटरवर होता. पण मरणाला चकवण्याची कलादेखील श्रेयशने आत्मसात केली आहे. नव्या वर्षात तो नव्या उत्साहात उभा राहिला. शाळा, संगीत, मित्रपरिवार हे त्याचे नेहमीचे कार्यक्रम पुन्हा सुरू झाले आहेत.
श्रेयशच्या आईबाबांना श्रेयशचा खूप अभिमान वाटतो. त्याचे आईवडील म्हणून आम्ही स्वतःला खूप नशिबवान समजतो. कधी कधी तो खूप गंभीर होतो. त्या वेळी त्याची खूप काळजी वाटते. तो आमच्यासोबत कायम राहावा अशी इच्छा ते व्यक्त करतात. तो आजारी असल्यासारखे आम्ही त्याला जाणवू दिले नाही. त्याला इतर कामांमध्ये इतके गुंतवून ठेवतो की, लोकांनी प्रोजेरियाबद्दल चर्चा न करता त्याला कामाबद्दल विचारावे असे त्यांना वाटते.

आपला स्वभाव, वागण्या-बोलण्यातून श्रेयश समोरच्याला आपलेसे करून टाकतो. त्यापुढे आजार वैगेरे या क्षुल्लक गोष्टी वाटू लागतात. आपले आजारपण, आयुर्मान या साऱयाबद्दल त्याला पुरेपूर जाणीव आहे. पण प्रत्येकाने आपले आयुष्य मनमुराद, मनसोक्त जगावे असे तो सांगतो आणि स्वतःची त्याच मार्गावरून जातो. ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना… कभी अलविदा ना केहना…’ हे गाणे श्रेयशने गायले की समोरच्याच्या काळजाचा ठोका चुकतोच. अमिताभ यांच्या भेटीनंतर त्याला आता अरिजित सिंगला भेटून त्याच्यासोबत गाणे गाण्याची त्याची इच्छा आहे

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या