
मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे येत्या 20 ऑक्टोबर रोजी शाहीर अमर शेख जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संभाषिते नियतकालिन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून अभासी पद्धतीने हा कार्यक्रम पार पडणार आहे. यंदा महाराष्ट्र राज्य निर्मितीचे हे हीरक महोत्सवी वर्ष असून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शाहीर अमर शेख यांचा मोलाचा सहभाग होता, त्याचे स्मरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार, खासदार पद्मश्री कुमार केतकर यांचे अमर शेख यांच्या जीवन कार्यासंबंधी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जयंती समारंभाच्या उद्घाटनाचे निमंत्रण सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना देण्यात आले आहे. समारंभाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधान परिषद सदस्य उल्हास पवार, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विनोद पाटील तसेच मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. राजेश खरात असणार आहेत.
यावेळी ‘संभाषिते’ या मुंबई विद्यापीठाच्या नियतकालिकात शाहीर अमरशेख यांच्या संबंधी लेख प्रकाशित होणार आहेत. शाहीर निशांत जैनू शेख हे शाहीर अमर शेख यांनी लिहिलेल्या गीतांवर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत आपण लोककला अकादमी या युटय़ुब चॅनेल वर लाईव्ह पाहू शकता असे शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे आणि लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी स्पष्ट केले आहे.
























































