बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील आंदोलनकर्त्याना बजाविलेले मनाई आदेश प्रशासनाकडून रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील आंदोलनकर्त्याना बजाविलेले मनाई आदेश प्रशासनाकडून रद्द करण्यात आले आहेत.माजी खासदार आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह चार जणांचे मनाई आदेश रद्द करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी एम देवेंदर सिंह यांनी जारी केलेल्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्याना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आला होता. हे जारी केलेले आदेश क्र. जिविशा/रिफायनरी प्रकल्प/3245-3250/2023 पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या दि.11 मे 2023 पत्राच्या अनुषंगाने मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ज्या व्यक्तींना मनाई आदेश जारी करण्यात आले होते व हे आदेश आता रद्द करण्यात आले. त्या व्यक्तींमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष देवाप्पा अण्णा शेट्टी उर्फ राजू शेट्टी, जनार्दन गुंडू पाटील (जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संघटना), अशोक केशव वालम, जालिंदर गणपती पाटील, स्वप्नील सीताराम सोगम आणि सत्यजित विश्वनाथ चव्हाण यांचा समावेश आहे. हे रद्द आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.