नॅशनल हेराल्ड प्रकरणी 752 कोटींची मालमत्ता जप्त

काँग्रेसशी संबंधित नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि संलग्न कंपन्यांविरुद्ध मनी लॉण्डरिंगप्रकरणी सुरू असलेल्या तपासकामाचा एक भाग म्हणून ईडीने मंगळवारी 752 कोटींची स्थावर मालमत्ता आणि समभाग जप्त केले. विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याकडून तीक्ष्ण टीका होऊ लागल्यावर ईडीने लगेचच सक्रिय होत ही कारवाई केली आहे.

यंग इंडियनच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे असोसिएटेड जर्नल्स लि. (एजीएल) हे पब्लिशर आहेत. दिल्ली, मुंबई आणि लखनौसह अनेक शहरांमध्ये एजीएलने गुह्याद्वारे मिळवलेली मालमत्ता असल्याचे तपासात उघड झाले होते. ही 661.69 कोटींची मालमत्ता आणि यंग इंडियनच्या ताब्यातील 90.21 कोटींचे एजीएलचे समभाग यावर जप्ती आणण्यात आली असल्याचे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे.

हे तर सुडाचे राजकारण – काँग्रेस

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत असताना ईडीने केलेल्या या कारवाईची काँग्रेसने सूड घेण्याच्या क्षुद्र कारवाया, अशी संभावना केली आहे. विधानसभा निवडणुकांत पराभव निश्चित असलेल्या भाजपा आघाडीतील ईडी भागीदार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. एजीएल आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी या प्रकरणात समभागधारक आणि काँग्रेसच्या देणगीदारांची फसवणूक केली असल्याचा आरोप ईडीने केला आहे. नॅशनल हेराल्डची मालकी असलेल्या यंग इंडियनचे प्रत्येकी 38 टक्के समभाग सोनिया आणि राहुल यांच्याकडे आहेत.