
मुंबईत फेब्रुवारीमध्ये झालेल्या मालमत्ता नोंदणीने 11 महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे. शहरात महिनाभरात एकूण 9,805 युनिटस् मालमत्ता विक्री नोंदणी झाली. या नोंदणीतून सरकारचा महसूल गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत 56 टक्क्यांनी वाढला आहे, असा निष्कर्ष ‘नाइट फ्रँक इंडिया’ने आपल्या अहवालात नोंदवला आहे.
यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातील मालमत्ता विक्री नोंदणीतून सरकारच्या महसुलात 549 कोटी रुपयांची भर पडणार आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत मालमत्ता नोंदणी 4 टक्क्यांनी कमी झाली, मात्र महसुलात 56 टक्क्यांची वाढ झाली आहे. मालमत्ता नोंदणीची दैनंदिन सरासरी 350 इतकी नोंदवली गेली आहे. ही दैनंदिन सरासरी मागील 11 महिन्यांतील सर्वोच्च असल्याचे नाईट फ्रँकने नमूद केले आहे. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये पश्चिम उपनगराचे वर्चस्व कायम राहिले आहे. एकूण मालमत्ता विक्रीपैकी 55 टक्के मालमत्ता विक्री ही पश्चिम उपनगरात नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मध्य उपनगरात 33 टक्के मालमत्ता विक्री नोंदणी झाली आहे.



























































