
कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर केंद्र शासनाने सूड बुद्धीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी कॉंग्रेसने शहरातून आसूड मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश शेलार यांनी केले. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाची सुरवात करण्यात आली.
आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा देत मोदी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. मोर्चा नाईक चौकात आल्यानंतर शेलार म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे. देशासाठी गांधी घराण्याने मोठा त्याग केला असून हा त्याग वाया जाणार नाही. आगामी काळात देशात पुन्हा एकदा कॉंग्रेस राजवट येऊन राहुल गांधी पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन मोर्चा विसर्जित करण्यात आला. या मोर्चात प्रकाश शेलार यांच्यासह महेंद्र सोलाट,राहुल साळवे,मिठूभाई शेख,भगवान बुधवंत,संजय गोरे,गणेश दिनकर,संभाजी पाठक,अशोक गाडेकर,नितीन खंडागळे,दत्ता पाठक,धनराज घोडके,महेश दौंड,संदीप राजळे,शंकर मिरपगार,अनंत शेळके,शैलेश शिरसाठ,दादा साळवे,साईनाथ कोरडे,शिवाजी गायकवाड,अंबादास कापसे,आदिनाथ ससे,सुभाष क्षेत्रे आदी सहभागी झाले होते.




























































