धारावीत खोके सरकारच्या जीआरची होळी

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली धारावी परस्पर अदानी समूहाला विकण्यासाठी काढलेल्या जीआर आणि टीडीएस नोटिफिकेशनची आज गनिमी काव्याने होळी करत धारावी बचाव आंदोलनातील सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. त्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून रोखले असता झटापट झाली.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम राज्यातील मिंधे सरकारने स्पर्धा डावलून अदानी समूहाला दिले. त्यासाठी लागलीच जीआर आणि नोटिफिकेशनही काढले. मात्र, स्पर्धा डावलून तसेच हिंडेनबर्ग अहवालाने घोटाळेबाज अदानीचा खरा चेहरा समोर आल्यामुळे धारावीकरांचा अदानी समूहाच्या पुनर्विकासाला तीव्र विरोध आहे. केवळ अदानी समूहाला फायदा व्हावा, म्हणून धारावी प्रकल्प राज्य सरकारने अदानीच्या घशात घातला आहे. अशा घोटाळेबाज माणसाच्या हाती 12 लाख धारावीकरांचे भवितव्य सोपवू नका. जीआर आणि नोटिफिकेशन तात्काळ रद्द करून सरकारने स्वतŠ धारावीचा पुनर्विकास करावा, अशी मागणी धारावी बचाव आंदोलनकर्त्यांची आहे. आज झालेल्या आंदोलनात काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा संपर्कप्रमुख धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबूराव माने,  उपविभागप्रमुख यशवंत विचले, महिला संघटक श्रद्धा जाधव, विठ्ठल पवार, प्रकाश आचरेकर, सुरेश सावंत, कविता जाधव, माया जाधव, शेकापचे डॉ. राजेंद्र कोरडे, आपचे संदीप कटके, आरपीआयचे सिद्धार्थ कासारे, वंचित आघाडीचे विनोद जैसवाल, भाडेकरू महासंघाचे अनिल कासारे, बसपाचे श्यामलाल जैसवाल, शैलेंद्र कांबळे, संजय भालेराव, सपाचे अशफाक खान, माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी, वसंत नकाशे, राष्ट्रवादीचे उल्लेश गजाकोश सहभागी झाले होते.